यवतमाळ : नागरिकांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात पुन्हा एक बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. लॉकडाऊनच्या काळातील हा १२ वा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे थांबवण्यात आला आहे.
दारव्हा तालुक्यातील सावंगी या गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह ता. मानोरा, जिल्हा वाशिम येथील व्यक्तीसोबत शेजारच्या गावातील स्वयंघोषीत समाज सेवकाच्या मदतीने २३ तारखेला आप्तेष्ठाच्या उपस्थितीत होणार होता. याबाबत गोपनीय तक्रार महिला बाल विकास कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी सावंगी व सावळा या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या मदतीने मुलीच्या पालकांची भेट घेऊन मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले.
तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये दखलपात्र गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे पालकांनी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावरच तिचे लग्न करण्याबाबत लेखी जवाब दिला व मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत लग्न न करण्याचे ठरविले.
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले, दारव्हाचे तहसिलदार जाधव तसेच लाडखेडचे ठाणेदार विनायक कारेगावकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, क्षेत्रीय कार्यकर्ता आकाश राऊत, सावळा येथील ग्रामसेवक आर. पी. मुंडवाईक, आयसीडीएस प्रकल्प अधिकारी रेखा किनाके, पोलीस कर्मचारी गजानन वाटमोडे, पवनकुमार व्यवहारे, सरपंच छाया विनोद ठाकरे, पोलीस पाटील प्रकाश जाधव व विनोद ठाकरे, अंगणवाडी सेविका रेखा खंदारे, पुरुषोत्तम नानवटकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित पार पडली.
अशाप्रकारे बाल विवाहाची माहिती असल्यास नागरिकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक, यवतमाळ येथे अथवा चाईल्ड लाईन १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेन्द्र राजुरकर यांनी केले आहे.
