यवतमाळ: जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच मृत्युचा आकडासुध्दा वाढत आहे. आज (दि. २५) जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 25 झाली आहे. तर १० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यात भर पडली.
मृत झालेल्या दोन जणांमध्ये एक जण यवतमाळ शहरातील भोसा रोड येथील ४८ वर्षीय पुरुष आणि उमरखेड शहरातील वॉर्ड क्रमांक १ येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १० जणांमध्ये सहा पुरुष व चार महिला आहे. यात घाटंजी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, मारेगाव शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील एक महिला यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत २३४ ॲक्टी-व्हपॉझिटीव्ह होते. यापैकी दोन जणांचा मृत्यु झाल्याने ही संख्या २३२ वर आली. मात्र शनिवारी नवीन १० पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडल्याने ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २४२ वर पोहचली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे १६५ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले ७७ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ७१८ झाली आहे. यापैकी ४५१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २५ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ८१ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी ९१ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने १२२४१ नमुने पाठविले असून यापैकी ११२०८ प्राप्त तर १०३३ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात १०४९० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.