विविध संस्कृतीने नटलेल्या देशात सण उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे एक वेगळं महत्त्व असतं. दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे आगळी वेगळी परंपरा जपली जाते. यावर्षी सुद्धा येथील लुगजाई टेकडीवर सापांना जीवनदान देवून नागपंचमीला परंपरा जपण्यात आली.
दारव्हा आर्णी मार्गावर महागाव येथील वन विभागाच्या क्षेत्रात टेकडीवर प्राचीन श्री लुगजाई माता मंदिर आहे. नैसर्गिक वनसंपदेने नटलेला परिसर मन प्रसन्न करतो. मंदीर परिसरात एका दगडावर श्री नागदेवता कोरलेले आहे. अबाल वृद्ध मंडळी दर्शन घेतात. विशेष म्हणजे दरवर्षी गावातील सर्प मित्र मंडळ नागपंचमीला गावात पकडलेल्या सापांना त्या टेकडीवर सोडून जीवनदान देतात. आजवर शेकडो सापांना जीवदान देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी ओसरली असली तरी सापांना जीवदान देवून परंपरा जपण्यात आली.सापांना जीवदान देण्यासाठी सर्प मित्र मंडळाचे प्रमुख शेषराव महाराज, बंडू बीहाडे, किरण बिहाडे, पद्माकर भगत, भारत बोरचाटे, दिनेश ताजने, मयुर दुधे, दत्ता राजने, गोपाल बिहाडे, वसंत इंगोले या सर्प मित्रांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शासनाने निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन मंदिराकडे लक्ष दिल्यास वैभव प्राप्त होऊ शकेल. त्या मंदिरावर जाण्यासाठी रस्ता तयार करावा अशी, मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केली.