राज्यातील शिवसेना,राष्ट्रवादी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशा भिन्न विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. सरकार अस्तित्वात येऊन सहा महिने झाली. विरोधी पक्ष भाजप महाविकास आघाडीचे सरकार आल्या पासून सातत्याने टीका करीत असतानाच शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या माध्यमातून प्रथमच सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.
अग्रेलेखातील महत्वाचे मुद्दे
काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती ती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोक श्री. उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठी असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही ही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, इतकेच शेवटी सांगायचे.!
सामना'च्या अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या जरी देण्यात आल्या असल्या तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसवर अग्रलेखाच्या माध्यमातून कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमधील मंत्री निर्णय प्रक्रियेत "आम्हाला स्थान मिळत नाही, सरकारमध्ये आम्हाला विश्वासात घेतल्या जात नाही, विधान परिषदेच्या जागा वाढवून द्या" या अशा अनेक विषयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. तद्नंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेणार होते. मात्र काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, त्यामुळे काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांची नाराजी बोलुन दाखवता आली नाही.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजी बद्दल भाष्य करण्यात आलं आहे. ते करताना काँग्रेस दुखावली जाणार नाही, याची सुद्धा काळजी अग्रलेखातून घेण्यात आली आहे. जुनी खाट जरा अधून मधून जास्त कुरकुरते आहे. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारात अधून मधून असे कुरकुरणे सहन करण्याची ची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे',असे देखील लिहिले आहे.