Breaking

Post Top Ad

रविवार, ७ जून, २०२०

किळसवाण्या विवाह सोहळ्यास कोरोनाचा ब्रेक

किळसवाण्या विवाह सोहळ्यास कोरोनाचा ब्रेक

विवाह हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. अलीकडच्या काळात विवाह सोहळ्यांनी अत्यंत विकृत स्वरूप धारण केले आहे . हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेने तर वधूपक्षाचे पार कंबरडे मोडून टाकले जाते.शिकून नोकरीला लागलेली पोरं लग्नाच्या बाजारात हुंड्याच्या माध्यमातून स्वतःला विकून टाकतात. दहा ते वीस लाख रुपये हुंडा घेणारे महाभाग आजही समाजात जिवंत आहेत.

मुलगी ही परक्याचे धन आहे ही वधुपित्याची  मानसिकता मुलीचे सारे भावविश्व उद्ध्वस्त करीत असते.मुलीच्या शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा तिच्या लग्नावर कर्ज काढून खर्च करणारे लोक आजही सर्वत्र दिसतात. एका लग्नात होणारा खर्च अनेकांना आर्थिक खाईत लोटत असतो.हा वायफळ खर्च अनेक हुशार लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवतो ही या विकृत विवाह सोहळ्याची दुसरी बाजू अधिक गंभीर आहे.खोट्या प्रतिष्ठेपायी मोठमोठाले खर्चिक विवाह सोहळे आज मोठ्या प्रमाणात समाजात होताना दिसतात. श्रीमंत लोकांचे अंधानुकरण गरीब लोकही करायला लागतात. हजारो पत्रिका छापून वऱ्हाड गोळा केले जाते. यामुळे श्रमशक्तीचा  मोठ्या प्रमाणात नाश होतो. 

वधू-वर पक्षास राग येऊ नये म्हणून अनेक जण या विवाह सोहळ्याला हजेरी लावतात. मात्र यात वेळ आणि पैसा याची नासधूस होते याकडे कोणाचेही लक्ष नसते. विशेष म्हणजे कुठलेही लग्न नियोजित वेळेवर लागत नाही. बँडच्या तालावर नशेत नाचणारी तरुणपिढी, बुफेमध्ये होणारी अन्नाची नासाडी, वाहन व फटाक्यांवर होणारा खर्च, ध्वनि प्रदूषण यातून हे विवाह सोहळे टोकाच्या विकृतीचे कळस गाठत आहेत.मात्र कोरोना व्हायरस आला आणि विवाहाच्या साऱ्या संकल्पनाच बदलल्यात. सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे, मनात संसर्गाची भीती आहे. 

त्यामुळे आता नाईलाजास्तव भपकेबाज विवाह सोहळे बंद झाले आहेत. मोजक्या पन्नास लोकांच्या उपस्थितीत घरातल्या घरात विवाह करणे आवश्यक झाले आहे. या प्रकाराला आता इच्छा नसतानाही  आदर्श विवाह म्हणावे लागत आहे.ज्योतिषाने पंचांग पाहून जानेवारी महिन्यात काढलेल्या शुभमुहुर्ताचाही फोलपणा  या कोरोना व्हायरस ने उघड केला आहे. कोरोनाचे निमित्ताने का होईना हे छोटे विवाह सोहळे दोन्ही कुटुंबांना आर्थिक लुटीतून बाहेर काढण्यास पूरक ठरत आहेत.कोरोना नंतरही हाच ट्रेण्ड कायम राहिला तर येणारा काळ आर्थिक समृद्धीकडे नेणारा ठरू शकेल यात तिळमात्र शंका नाही.यंदाच्या लॉक डाऊन मध्ये या विवाह सोहळ्याचे माध्यमातून  प्रत्येक गावाचे किमान तीस लाख रुपये बचत झाले आहे. कोरोनाचा हा ब्रेक नव्या आर्थिक समृद्धीची नांदीच आहे.

santosh arsod ner
संतोष अरसोड, नेर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad