मुंबई : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आपल्या कार्यक्षमतेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात मृद व जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, त्यांच्या या कार्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष दखल घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मंत्री राठोड यांचे कौतुक होत असून, राज्य शासनामध्ये त्यांची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.
मंत्री संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात तसेच राज्याच्या विविध भागांमध्ये जलसंधारणाच्या विविध योजनांचा प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. ‘जलयुक्त शिवार’, शेततळी निर्माण, नालाबांधणी, मृद धूप नियंत्रण यांसारख्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात पाणीटंचाई कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
राज्यभरात राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली चालविल्या जाणाऱ्या योजनांमुळे जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे तसेच बऱ्याच भागांमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतीला आधार मिळत असून, स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या संख्येतही घट झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीत मंत्री राठोड यांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले.त्यांनी सांगितले की, "संजय राठोड यांनी जलसंधारण क्षेत्रात दिलेला भर आणि परिणामकारक अंमलबजावणी ही राज्यासाठी एक आदर्श ठरली आहे."
राज्य सरकारच्या पुढील धोरणांमध्येही मंत्री राठोड यांचा मोलाचा वाटा राहणार असून,त्यांच्या पुढाकारामुळे राज्यातील जलव्यवस्थापन अधिक सक्षम आणि शाश्वत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
