यवतमाळ: राळेगाव येथे गोवा व मध्य प्रदेश या राज्यातून विक्रीसाठी आलेल्या मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. यात 1 हजार 632 लिटर विदेशी दारूसाठा जप्त करून संबंधित दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. पथकाने केलेल्या कारवाईत राळेगाव येथे गोवा व मध्य प्रदेश राज्यातून विक्रीसाठी आलेली दारू जप्त करण्यात आली आहे.
सदर कारवाईत 2 हजार 600 बनावट बुचे, गोवा राज्यात उत्पादीत मद्याच्या 2 हजार मिलीच्या 10 बॉटल्स, 750 मिलीच्या 1 हजार 504 बॉटल्स, 180 मिलीच्या 23 बॉटल्स जप्त करण्यात आल्या. मध्य प्रदेश राज्यात निर्मित 180 मिलीच्या 33 बॉटल्स, तसेच 20 लिटर क्षमतेचे मद्य भरलेले 13 जार, वीस लिटर क्षमतेचे मद्य भरलेले 3 कॅन, रंग व इसेन्स सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आले.सदर कारवाईतील मुद्देमाल हा राळेगाव येथील शिवा बार या एफएल -3 अनुज्ञप्तीला लागून असलेल्या घरामध्ये व नोकरनामाधारक यांच्या घरामध्ये जप्त करण्यात आल्याने सदर एफएल -3 अनुज्ञप्तीविरुद्ध विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
पुढील तपास सुरू आहे. आरोपिंची नावे जयनारायण दुबे, ओम सुभाष बाजपेई अशी आहे.या कारवाईत एक वारस गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्यात दोन आरोपी सहभागी आहे. दोनही राज्यातील एकून 1 हजार 632 लिटर विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. जप्त मालाची एकून किंमत 6 लाख 89 हजार 798 रुपये ईतकी आहे. जप्तीची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितेश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक निरीक्षक राम सेंगर, निरीक्षक पुरुषोत्तम बोढारे, दुय्यम निरिक्षक धर्मेंद्र त्रिपाठी, श्री बडवाईक, चंद्रकांत नागूलवाड व भरारी पथकाचे जवान संदीप दुधे, मनोज शेंडे, श्री.खोब्रागडे, श्री.चिद्दरवार, महिला जवान वर्षा पवार यांनी केली, असे उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांनी कळविले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक भरारी पथक यवतमाळ हे करत आहेत.