दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि लाठीचार्ज प्रकरणावर अभिनेत्री गिरीजा ओकने सोशल मीडियावर भूमिका मांडल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काहींनी तिचे समर्थन केले, तर अनेकांनी अनफॉलो करण्याची भूमिका घेतली.
मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांच्या लाठीचार्ज प्रकरणावर सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत असून, काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला अनफॉलो केल्याचाही दावा केला आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. याच दरम्यान 7 गिरीजा ओकने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करणारी पोस्ट शेअर केली होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनालाही तिने पाठिंबा दर्शविला.
यानंतर गिरीजाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येऊ लागल्या. तिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत तिला आलेल्या काही डायरेक्ट मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले. "चांगले, वाईट आणि अत्यंत आक्षेपार्ह असे अनेक संदेश मला आले. हे त्यातील काही निवडक संदेश आहेत," असे तिने कॅप्शनमध्ये नमूद केले.
या संदेशांमध्ये काहींनी तिच्या भूमिकेवर टीका करत, "अशा राजकीय विषयांपासून दूर राहा," असा सल्ला दिला. काहींनी तिच्यावर प्रचारासाठी पोस्ट केल्याचा आरोप केला, तर अनेकांनी तिला अनफॉलो करत असल्याचेही संदेश पाठवले. दुसरीकडे काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी गिरीजाच्या भूमिकेचे समर्थन करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करण्याची भूमिका मांडली.
दरम्यान, गिरीजा ओकने आणखी एका पोस्टमध्ये नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासण्याचे आणि आवश्यक असल्यास नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे हे आंदोलनाइतकेच महत्त्वाचे असल्याचे तिने नमूद केले.
गिरीजा ओकच्या सोशल मीडिया पोस्टनंतर निर्माण झालेली चर्चा सुरू असून, सामाजिक आणि राजकीय विषयांवर कलाकारांनी भूमिका मांडावी का, यावरही सोशल मीडियावर मतमतांतरे व्यक्त होत आहेत.
°°°°°
