अशोक खरात प्रकरणावरील 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटाच्या टीझरनंतर रुपाली चाकणकर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत परवानगीशिवाय आपली भूमिका साकारल्याचा आरोप केला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
राज्यात चर्चेत राहिलेल्या अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना परवानगी न घेता आपले पात्र चित्रपटात दाखवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अशोक खरात प्रकरणानंतर त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर निराधार आरोप करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले असून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या मुलांनाही या वादात ओढले गेल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी पुढे सांगितले की, आशा मिरगे यांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्या नोटिसा स्वीकारण्यात आल्या नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली असून रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि आशा मिरगे यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रुपाली चाकणकर यांनी १० जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. काही यूट्यूब चॅनेल्सविरोधातही न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चित्रपटासंदर्भात बोलताना त्यांनी म्हटले की, एखाद्या व्यक्तीवर आधारित भूमिका साकारताना संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र आपल्या बाबतीत अशी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधातही कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद झळकणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चित्रपटाबाबतची चर्चा आणखी रंगली असून इतर कोणकोणत्या व्यक्तींची पात्रे चित्रपटात दाखवली जाणार, याकडेही राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक राजकीय आणि सामाजिक स्तरांवरील व्यक्तींची नावे चर्चेत आली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्याबाबतही विविध आरोप करण्यात आले होते. मात्र या आरोपांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.
°°°°°