मुसळधार पावसाने उघड केली यंत्रणेची बेपर्वाई; तीन दिवसांत पाच दुर्घटना, पाच जणांचा मृत्यू !

 

मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसादरम्यान उघडे मॅनहोल, विजेचा धक्का आणि झाडे कोसळण्याच्या घटनांमुळे तीन दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुंबई : आणि परिसरात मान्सूनच्या आगमनानंतर अवघ्या काही दिवसांत घडलेल्या सलग दुर्घटनांनी प्रशासनाच्या पूर्वतयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुसळधार पावसामुळे उघडे मॅनहोल, पाण्यात उतरलेला विजेचा प्रवाह, झाडे कोसळणे आणि जलभराव अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या तीन दिवसांत विविध दुर्घटनांमध्ये एका विद्यार्थ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

ताजी घटना मुंबईतील साकीनाका परिसरात घडली. खैराणी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाला. परिसरात जलनिस्सारण यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. मोबाईलवर बोलत असताना त्यांचे त्या मॅनहोलकडे लक्ष गेले नाही आणि ते थेट त्यात पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवून त्यांना बाहेर काढले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची दखल महाराष्ट्र विधानसभेतही घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराला गंभीर स्वरूपाचे प्रकरण संबोधत सरकारकडून स्पष्टीकरण मागितले. या प्रकरणी संबंधित विभागीय अधिकारी आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ठाण्यातील मुंब्रा परिसरातही पावसामुळे आणखी एक दुर्दैवी घटना घडली. यास्मीन पार्क परिसरात १७ वर्षीय आलिया ही पावसाच्या पाण्यात उतरलेल्या विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील विद्युत सुरक्षेची पाहणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

डोंबिवलीतील हनुमान नगर परिसरात ४२ वर्षीय शशी राहुल चक्र यांचा रस्त्यावर पडलेल्या विद्युत तारेमुळे मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने त्या त्याच्या संपर्कात आल्या. स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणीही संबंधित विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबईतील नेरुळ परिसरात एलपी पुलाजवळ साचलेल्या पाण्यातून जात असताना १७ वर्षीय शुभांगी बलखंडे आणि १९ वर्षीय उज्ज्वला वाघ या दोघींनाही विजेचा धक्का बसला. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक तपासात भूमिगत वीज केबल खराब झाल्यामुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, ठाण्यातील उल्हासनगरच्या जिजामाता परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने एका ७० वर्षीय वृद्ध महिला अनेक तास घरात अडकून पडल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले. या बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

यापूर्वी ३० जून रोजी मुंबईतील चेंबूर परिसरात शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळल्याने ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. या अपघातात बसमधील अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली होती.

अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या सलग दुर्घटनांमुळे मान्सूनपूर्व सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उघडे मॅनहोल, निकृष्ट विद्युत सुरक्षा, धोकादायक झाडे आणि जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याशिवाय अशा दुर्घटनांना आळा बसणार नाही, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

°°°°°





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने