म्हाडा मुंबई मंडळाच्या २०२६ सोडतीतील विक्रोळी कन्नमवार नगर प्रकल्पातील ६१० सदनिका आता फक्त उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करण्यात आल्या असून अर्ज प्रक्रियेला २८ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने २०२६ च्या संगणकीय गृहनिर्माण सोडतीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला असून विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच नागरिकांना अर्ज प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृती आणि अनामत रक्कम भरण्याच्या मुदतीलाही वाढ देण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांना आता २८ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
मुंबई मंडळाने यापूर्वी जाहीर केलेल्या २६४० सदनिकांच्या सोडतीमध्ये विक्रोळीतील कन्नमवार नगर प्रकल्पातील संकेत क्रमांक ५३८ आणि ५३९ अंतर्गत असलेल्या १२२१ सदनिकांच्या किमतीत ७.५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता या सदनिकांपैकी ६१० सदनिका स्वतंत्रपणे संकेत क्रमांक ५३८-अ आणि ५३९-अ अंतर्गत फक्त उच्च उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मंडळाच्या माहितीनुसार हा बदल संगणकीय सोडत प्रणालीमध्ये १४ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून अद्ययावत करण्यात येणार आहे.
म्हाडाने स्पष्ट केले आहे की, ७.५ टक्के दरकपातीचा लाभ नव्याने उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सदनिकांनाही लागू राहणार आहे. तसेच या प्रकल्पातील प्रत्येक सदनिकेसोबत एक वाहनतळ विनामूल्य देण्यात येणार आहे. त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील इच्छुक अर्जदारांसाठी ही योजना अधिक आकर्षक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदारांना २९ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम भरता येणार आहे. तसेच आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. अर्जांची प्रारूप यादी १० जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असून १२ जूनपर्यंत दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत. अंतिम स्वीकृत अर्जांची यादी १६ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संगणकीय सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ पुढे जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे.
मुंबई मंडळाने ३० मार्च २०२६ रोजी मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. यामध्ये कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा येथील प्रकल्पांचा समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
कन्नमवार नगर प्रकल्पातील बिल्डिंग क्रमांक २ अ आणि ब, पॉकेट २ अंतर्गत संकेत क्रमांक ५३८ व ५३८-अ मधील प्रत्येकी २४० सदनिकांच्या किमती आता सुमारे १ कोटी ३४ लाख ६६ हजार रुपयांपासून १ कोटी ३६ लाख ८८ हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आल्या आहेत. तर बिल्डिंग क्रमांक ३ अ, ब आणि क अंतर्गत संकेत क्रमांक ५३९ व ५३९-अ मधील प्रत्येकी ३७१ आणि ३७० सदनिकांच्या किमती सुमारे १ कोटी ३४ लाख ८१ हजार रुपयांपासून १ कोटी ३७ लाख ३ हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
म्हाडाने नागरिकांना केवळ अधिकृत संकेतस्थळ आणि ‘आयएचएलएमएस २.० इंटिग्रेटेड म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टिम’ या मोबाईल अॅपद्वारेच अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींवर हे अॅप उपलब्ध आहे. तसेच सोडतीसंदर्भात कोणतीही फसवणूक किंवा प्रलोभने दिली जात असल्यास नागरिकांनी तत्काळ म्हाडाच्या दक्षता विभागाशी संपर्क साधावा, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींसाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
°°°°°