भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; शस्त्र परवाना, वापरलेली काडतुसे, लैंगिक अत्याचार, आर्थिक व्यवहार आणि अंधश्रद्धेचे धक्कादायक तपशील समोर
नाशिक : स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणून सादर करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर आणि धक्कादायक वळण घेतले असून तपासादरम्यान अनेक भयावह बाबी समोर येत आहेत. फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवण्याच्या आरोपांपलीकडे जात या प्रकरणात शस्त्र परवाना, वापरलेली काडतुसे, लैंगिक अत्याचार, संशयास्पद धार्मिक विधी आणि मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहार यांचे गुंतागुंतीचे जाळे उलगडत आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, अशोक खरातकडे गेल्या १२ वर्षांपासून अधिकृत शस्त्र परवाना होता. १५ ऑक्टोबर २०१२ रोजी नाशिक जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करून त्याने हा परवाना मिळवला होता आणि १ जानेवारी २०२४ रोजी त्याचे नूतनीकरणही करण्यात आले होते. मात्र, सध्या त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असताना त्याला परवाना कसा देण्यात आला आणि त्याचे नूतनीकरण कशाच्या आधारे झाले, यावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खरातच्या फार्महाऊसवर पोलिसांनी केलेल्या झडतीत २१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी ५ काडतुसे वापरलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही काडतुसे नेमकी कोणत्या कारणासाठी वापरण्यात आली, याचा शोध पोलीस घेत आहेत. शस्त्राचा वापर धमकावण्यासाठी, संशयास्पद विधींसाठी की इतर कोणत्याही गुन्हेगारी कृत्यासाठी झाला का, याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणात लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोपही समोर आले आहेत. महिलांबरोबरच एका अल्पवयीन मुलीनेही खरातविरोधात तक्रार दाखल केली असून त्याने स्वतःला दैवी शक्ती असल्याचे भासवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आतापर्यंत त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले असून पीडित महिलांची संख्या वाढण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.
तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला असून नाशिकमधील आयुर्वेदिक औषधे व जडीबुटी विकणाऱ्या एका मोठ्या दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातने येथून हरिणाची कस्तुरी आणि इतर साहित्य खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नाशिकरोड परिसरातील एका ज्वेलरकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती समोर आल्याने त्या ज्वेलरलाही तपासाच्या कक्षेत आणण्यात आले आहे.
याचबरोबर, वावी येथील पुरातन वैजेश्वर मंदिर पाडण्याचा सल्ला देऊन धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप खरातवर आहे. मंदिराची शक्ती संपल्याचा दावा करत त्याने गावकऱ्यांना ते पाडण्यास प्रवृत्त केल्याची माहिती समोर आली असली तरी स्थानिकांनी यास ठाम विरोध केला होता.
आर्थिक बाबींमध्येही मोठे गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता असून खरातच्या ‘शिवनिका’ संस्थांचे बँक खाते सील करण्यात आले आहे. या संस्थांमार्फत झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरू असून त्याच्या आणि कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती गोळा केली जात आहे. नोंदणी विभागाच्या माध्यमातून राज्यभरातील मालमत्तेचा शोध घेतला जात असून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.
सध्या विशेष तपास पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोंदूगिरीच्या आडून उभारलेल्या या जाळ्याचा पूर्ण पर्दाफाश करण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.
-------------------------------
