राजपाल यादव जेलमध्ये; बॉलिवूड स्टार्सची मदत, पत्नी राधाने मानले आभार!

चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादव यांनी तिहार जेलमध्ये शरणागती पत्करली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला; पत्नी राधा यादव यांनी व्यक्त केले कृतज्ञता.

नवी दिल्ली : चेक बाउंस प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले अभिनेते आणि विनोदी कलाकार राजपाल यादव यांनी १० फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तिहार कारागृहात शरणागती पत्करली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली असून या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकारांनी त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या मदतीबद्दल राजपाल यादव यांच्या पत्नी राधा यादव यांनी भावनिक शब्दांत आभार व्यक्त केले आहेत.

एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना राधा यादव यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीने कठीण प्रसंगी साथ दिली आहे. “सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. इंडस्ट्रीने खूप सपोर्ट केला आहे. जे कोणी पुढे येऊन मदत करत आहेत, त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.” 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सोनू सूद, गुरमीत चौधरी, अजय देवगण, सलमान खान, वरुण धवन, गायक गुरु रंधावा तसेच संगीतकार राव इंदरजीत यादव यांसह काही कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. गायक मीका सिंग यांनीही पुढे येत ११ लाख रुपयांची मदत जाहीर केली. एका सोशल मीडिया निवेदनातून त्यांनी राजपाल यादव यांना या कठीण काळात पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आणि चित्रपटसृष्टीने एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन केले.

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांचा कर्जफेडीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी शरणागती पत्करली. न्यायालयीन नोंदीनुसार त्यांच्यावर सुमारे ९ कोटी रुपयांची देय रक्कम बाकी आहे. त्यांच्या विरोधात दाखल सात प्रकरणांपैकी प्रत्येकात सुमारे १.३५ कोटी रुपये अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. न्यायालयाने संबंधित रक्कम तक्रारदाराच्या बाजूने वर्ग करण्याचे आदेशही दिले आहेत.

२०१० साली दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी त्यांनी एका खासगी कंपनीकडून सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर कर्जफेडीत अडचणी निर्माण झाल्या आणि व्याजासह रक्कम वाढत गेल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण प्रकरणामुळे राजपाल यादव सध्या कारागृहात असले तरी चित्रपटसृष्टीकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.


-------






Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने