अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पीएम नरेंद्र मोदींबाबतच्या जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली अधिकृत प्रतिक्रिया; योग्य कारवाईचा इशारा.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत केलेल्या एका जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला असून त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत “योग्य ती कारवाई केली जाईल” असे स्पष्ट केले आहे.
हे वक्तव्य ऑक्टोबर २०२५ मधील असल्याचे सांगितले जाते. त्या काळात भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिका-भारत संबंधांमध्ये तणावाची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करत काही विधान केले होते. त्यांनी मोदी यांना “महान व्यक्ती” आणि कसोटीवर खरे उतरलेले नेते असे संबोधले होते. तसेच “मोदी ट्रम्पवर प्रेम करतात” असे म्हणताना त्यांनी ‘प्रेम’ हा शब्द वेगळ्या अर्थाने घेऊ नये, कारण ते मोदींचे राजकीय करिअर बर्बाद करू इच्छित नाहीत, असे हसत म्हणाले होते.
हा व्हिडिओ पुन्हा समोर आल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “मी संबंधित व्हिडिओ पाहिलेला नाही. मात्र असा कोणताही व्हिडिओ असल्यास, तो खरा असो किंवा खोटा, आम्ही त्यावर योग्य ती कारवाई करू.”
त्या काळात ट्रम्प यांनी असा दावा केला होता की भारताने अमेरिकेला रशियाकडून तेल खरेदीबाबत काही आश्वासन दिले आहे. मात्र भारताने त्यावेळी स्पष्ट केले होते की देशासाठी १४० कोटी नागरिकांची ऊर्जा सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असून त्यानुसारच निर्णय घेतले जातील.
ट्रम्प यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना भारत सरकारने अधिकृत भूमिकेत संयम राखत प्रकरणाची नोंद घेतल्याचे संकेत दिले आहेत.
----------------------------
