पीजी इलेक्ट्रोप्लास्ट या शेअरने तीन वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्याधीश केले, मात्र आता या मल्टीबॅगर शेअरचा प्रवास उलटला असून गेल्या काही महिन्यांत मोठी घसरण नोंदवली जात आहे.
मुंबई : शेअर बाजारात कोणता शेअर कधी गुंतवणूकदारांना मालामाल करेल आणि कधी मोठे नुकसान करेल, याचा नेमका अंदाज लावणे अवघड असते. काही काळापूर्वी गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा एक शेअर आता मात्र घसरणीच्या मार्गावर आहे. पीजी इलेक्ट्रोप्लास्ट या कंपनीचा शेअर याचे ताजे उदाहरण ठरत आहे.
एप्रिल 2022 मध्ये अवघ्या 2.89 रुपयांवर असलेला पीजी इलेक्ट्रोप्लास्टचा शेअर 5 जानेवारी रोजी तब्बल 630 रुपयांपर्यंत पोहोचला होता. या कालावधीत या शेअरने 20 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला. एप्रिल 2022 मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर अवघ्या तीन वर्षांत ती रक्कम दोन कोटी रुपयांहून अधिक झाली असती.
मात्र, गेल्या काही काळात या शेअरचा प्रवास पूर्णपणे बदललेला दिसत आहे. गेल्या 12 दिवसांपासून पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअरमध्ये सतत घसरण सुरू असून 5 जानेवारीनंतर हा शेअर सुमारे 15 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. बुधवारी या शेअरमध्ये जवळपास 2.85 टक्क्यांची घसरण झाली आणि तो 533 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांत पाहिले असता, या शेअरमध्ये सुमारे 33 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे.
या घसरणीमागे कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमधील बदल हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. डिसेंबर तिमाहीतील आकडेवारीनुसार, स्मॉल रिटेल गुंतवणूकदारांनी कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. सप्टेंबर तिमाहीत रिटेल गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 18.78 टक्के होती, ती डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस 16.5 टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच सुमारे 2.28 टक्क्यांची घट झाली असून याचा परिणाम शेअरच्या किमतीवर दिसून येत आहे.
पीजी इलेक्ट्रोप्लास्ट ही पीजी ग्रुपची प्रमुख कंपनी असून ती कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी टीव्ही, वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनर यांसाठी प्लास्टिक पार्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचे उत्पादन करते. मात्र, ही उत्पादने कंपनी स्वतःच्या नावाने विकत नाही, तर विविध नामांकित ब्रँडसाठी उत्पादन सेवा पुरवते.
एकेकाळी मल्टीबॅगर ठरलेला हा शेअर आता घसरणीच्या फेऱ्यात अडकलेला असून, गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.
[ शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा प्रमाणित आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.]
----------------------------------------
