आमिर खान आणि गौरी स्प्रॅट मुंबईत नव्या घरात एकत्र राहायला गेले आहेत. तिसऱ्या लग्नाच्या चर्चांवर आमिरने स्पष्ट भूमिका मांडत ‘माझ्या दिलात आधीच लग्न झालं आहे’ असं म्हटलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट यांचे नाते आता अधिकच दृढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आमिर आणि गौरी सध्या मुंबईतील एका नव्या आणि आलिशान घरात एकत्र राहायला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचे नाते कोणापासूनही लपलेले नसून, अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसत आहेत.
आमिर खान अनेकदा गौरीबद्दल आपले प्रेम उघडपणे व्यक्त करताना दिसतो. हातात हात घालून दोघे फिरताना पाहिल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चा आणखी रंगल्या आहेत. दरम्यान, आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांनाही वेग आला असतानाच, यावर खुद्द आमिर खानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एका रिपोर्टनुसार, आमिर आणि गौरी ज्या नव्या घरात राहायला गेले आहेत, ते आमिरच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या घरांपासून फारसे लांब नाही. या बदलाबाबत विचारले असता, आमिरने सांगितले की हा सगळा काळ त्याच्यासाठी थोडा गोंधळाचा आहे, कारण त्याची प्रोडक्शन फिल्म ‘हॅपी पटेल’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही आघाड्यांवर सध्या धावपळ सुरू आहे.
लग्नाच्या चर्चांवर बोलताना आमिरने स्पष्ट केले की, तो आणि गौरी एकमेकांबाबत खूप गंभीर आणि पूर्णपणे कमिटेड आहेत, मात्र सध्या लग्न करण्याचा कोणताही तातडीचा विचार नाही. आमिर म्हणाला की, तो आपल्या मनात गौरीशी आधीच लग्न केले आहे, मात्र कायदेशीररित्या हे नाते कधी औपचारिक करायचे, याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
आमिर खान म्हणाला, गौरी आणि मी एकमेकांबाबत खूप गंभीर आहोत. आम्ही पार्टनर आहोत आणि एकत्र आहोत. लग्नाबाबत सांगायचे तर माझ्या दिलात मी तिच्याशी आधीच लग्न केले आहे. आता याला कायदेशीर स्वरूप द्यायचे की नाही, हे पुढे कधीतरी ठरवू.
आमिर खानच्या या विधानानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, चाहते आणि बॉलिवूड वर्तुळात या नात्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
---------
