कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप व शिंदे गटाकडून संपर्क सुरू असून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास विचार करू, असे ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी सांगितले आहे.
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सात नगरसेवक सध्या महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून, सन्मानजनक प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असे स्पष्ट वक्तव्य ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हे वक्तव्य करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेचे पाच नगरसेवक शिंदे गटाच्या बाजूने गेले असून, त्यानंतर ठाकरे गटाचे चार नगरसेवकही शिंदे गटाला पाठिंबा देत वेगळे झाले. त्यामुळे ठाकरे गटाकडे सध्या सात नगरसेवक उरले आहेत. या सात नगरसेवकांनी गट नोंदणी करत उमेश बोरगावकर यांची गटनेतेपदी निवड केली आहे.
या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कल्याण-डोंबिवलीतील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती त्यांनी पक्षप्रमुखांना दिली. भाजप आणि शिंदे गटाकडून संपर्क केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणताही प्रस्ताव आल्यास पुढील भूमिका काय घ्यायची, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आले असून अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरेच घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, ठाकरे गटासोबत निवडणूक लढवलेल्या मनसेने मात्र सत्तेच्या गणितात वेगळी भूमिका घेत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. लोकांची कामे करायची असतील तर सत्तेच्या जवळ राहणे गरजेचे असल्याचे मत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे ठाकरे-मनसे युतीतून निवडणूक लढवली असली तरी प्रत्यक्ष सत्तास्थापनेच्या टप्प्यावर वेगळी समीकरणे तयार झाल्याचे चित्र आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर अनेक ठिकाणी नगरसेवकांची फोडाफोड सुरू असून त्याचा रोष मतदारांमध्येही दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवलीसह मुंबईतही काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यावरून सूचक वक्तव्य करत दावोसवरून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ‘राजकीय MOU’ बाकी असल्याचे संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणाची सत्ता येणार, ठाकरे गटाचे नगरसेवक नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
----------------------------
