14 कोटींच्या 'त्या' फसवणूक प्रकरणात आरोपींचे 'व्यवहार' समोर !

 

अध्यात्मिक शक्तीचा दावा, मुलींचा आजार बरा करण्याच्या नावाखाली कोथरुडच्या वेदिका पंढरपूरकरने गंडवले   

पुणे : पुण्यातील कोथरुडमध्ये दाम्पत्याला त्यांच्या मुलींचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवत तब्बल 14 कोटी 39 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार प्रकाशात आला आहे. मुलींच्या उपचाराच्या नावाखाली आध्यात्मिक शक्तींचा दावा करत या दाम्पत्याला मानसिकदृष्ट्या जाळ्यात ओढून त्यांची आयुष्यभराची कमाई लाटण्यात आली.

या प्रकरणात मुख्य आरोपी वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय 41), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय 42, रा. महात्मा सोसायटी, कोथरूड) आणि दीपक जनार्दन खडके (वय 65, रा. वाडीवरे, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच फसवणुकीत वेदिकाची आई आणि भाऊ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींच्या 39 बँक खात्यांबाबत माहिती मिळाली असून सध्या 13 खात्यांतील व्यवहारांचा तपशील पोलिसांच्या हाती आला आहे. या खात्यांमधून तब्बल 1,139 संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आतापर्यंत आरोपींकडून 54 लाख रुपये जप्त केले आहेत. फसवणुकीतून मिळवलेले मोठ्या प्रमाणातील सोने खासगी सावकारांकडे गहाण ठेवून आरोपींनी जवळपास 60 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याशिवाय, या पैशांमधून आरोपींनी काही मालमत्ता आणि वाहने विकत घेतल्याचे समोर आले असून मालमत्तेची सहा ते सात नोंदणी दस्तऐवज पोलिसांना मिळाले आहेत.

या प्रकरणातील पीडित शास्त्रज्ञ-दांपत्यातील पती दीपक डोळस हे आयटी इंजिनियर असून पत्नी शिक्षक आहे. दोन्ही मुलींना उपचारांची गरज असल्याने ते मानसिकदृष्ट्या कमकुवत अवस्थेत होते. याचा फायदा घेत आरोपी दीपक खडके यांनी “त्यांच्या अंगात शंकर महाराज येतात आणि ते कोणताही आजार बरा करू शकतात” असा दावा करून दांपत्याची दिशाभूल केली. वेदिका पंढरपूरकर हिने स्वत:च्या अंगातही महाराज येतात असा अभिनय करून दांपत्याला विश्वास बसवला. “तुमच्याकडे संपत्ती ठेवल्यास संकट येतील, म्हणून सर्व पैसे आणि मालमत्ता अर्पण करा” अशी खोटी भीती दाखवत दांपत्याला त्यांच्या सर्व मालमत्ता विकण्यास भाग पाडले.

दांपत्याकडील बँकेतील ठेवी, पुण्यातील फ्लॅट आणि प्लॉट तर गमावलाच, शिवाय इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस विकून त्या रकमा वेदिका आणि राजेंद्र खडके यांच्या खात्यांवर RTGS द्वारे वळते करण्यात आल्या. 2018 पासून सुरू असलेली ही फसवणूक अनेक वर्षांनी उघडकीस आली असून पोलिस तपास सुरू झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण प्रकाशात आले.

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले की आरोपींनी लाटलेल्या पैशांची विल्हेवाट कशी लावली, कोणत्या नावे संपत्ती खरेदी करण्यात आली आणि आणखी किती व्यवहार या गुन्ह्याशी संबंधित आहेत याचा तपास सुरू आहे. गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. मूळ तक्रारदारांच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपींना 3 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

------------------------------------------------



 

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने