मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या करून आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली. या मृत्यूनंतर उद्भवलेल्या वादळाने संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी मोहोज देवढे गावात तणावपूर्ण वातावरणात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माहेरच्या लोकांनी आरोपी अनंत सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ परिस्थिती चिघळली.
पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि शेवटी घरापासून काही अंतरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी सासरे भगवान गर्जे यांनी पार पाडला, तर गौरीचे वडील अक्षरशः कोसळून आक्रोश करत न्यायाची मागणी करत होते. गौरीच्या वडिलांचा संताप आणि हंबरडा पाहून घटनास्थळी उपस्थित असणारेही हेलावले. पोलिसांसमोरच "तुम्हाला मुली असतील तर मला न्याय द्या… श्रीमंताच्या नादी लागू नका, त्यांच्या भपक्यावर जाऊ नका…" असे म्हणत त्यांनी आरोप लावले. मुलगी गमावलेल्या वडिलांचा हा आक्रोश गावभर पसरला असून लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान, रविवारी मध्यरात्री एक वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली. त्याच्यासह त्याचा भाऊ आणि बहिणीवर डॉ. गौरी पालवे गर्जे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरळीतील गर्जे यांच्या घराची झाडाझडतीही घेण्यात आली असून तपासाचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायालयाने गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी वकिलांनी अनंत गर्जे, त्याचे भावंड आणि कुटुंबीयांविरुद्ध असलेल्या गंभीर आरोपांची चौकशी आवश्यक असल्याचे सांगत कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायालयानेही सहमती दर्शवली.
अनंत गर्जेच्या वकिलांनी मात्र कोठडीला विरोध करत, दाखल गुन्ह्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट पुरावे नाहीत, असा युक्तिवाद केला. त्यांचा दावा असा की डॉ. गौरी यांनी घर आतून बंद केले होते आणि त्या घरी एकट्याच होत्या. याशिवाय लग्नापूर्वीच अनंत गर्जेचे चालू असलेले प्रेमसंबंध गौरी यांच्या कुटुंबीयांना सांगितले होते, असा दावा त्यांनी न्यायालयात केला. परंतु गौरीचे वडील अशोक पालवे यांनी केलेले गंभीर आरोप, लातूर येथील रुग्णालयातील दस्तऐवज आणि कुटुंबीयांची भूमिका पाहता तपास विस्तृत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात सर्वात चिंता वाढवणारी बाब म्हणजे गौरीच्या कुटुंबीयांचा दावा की त्यांना अनंत गर्जेच्या कथित संबंधांची माहिती असली, तरी लग्नानंतर गौरीला मानसिक छळ, ताणतणाव आणि सततच्या वादांना सामोरे जावे लागले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अधिक तीव्र केला आहे.
गावकऱ्यांचा आणि नातेवाइकांचा आरोप असा आहे की सत्ता, श्रीमंती आणि प्रभावाच्या दबावाखाली गौरीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट सासरच्या दारात आणून अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली होती, ज्यामुळे वातावरण अधिकच तापले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा तणाव निवळला असला तरी लोकांच्या मनातील रोष अजूनही शांत झालेला नाही.
गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. गौरीच्या मृत्यूविषयी त्यांच्या आई-वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त करत ननंद आणि दीरालाही अटक करण्याची मागणी केली आहे.
गौरी पालवे यांच्या वडिलांनी वरळी पोलिसांना पत्र देत म्हटले आहे की, “मी अनंत गर्जे, अजय गर्जे आणि शितल आंधळे या तिघांची नावं आरोप पत्रात दिली होती. पण सध्या फक्त अनंतला अटक झाली असून इतर दोन आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांनाही तत्काळ अटक करावी. तसेच हत्येच्या दिवशी बिल्डिंगमधील लिफ्ट, जिना आणि मुख्य प्रवेशद्वाराचा पूर्ण दिवसाचा CCTV फुटेज मिळावा,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिले, “एक घर उभं करू शकते ती महिला, पण अनैतिक संबंध ठेवून दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करणाऱ्या महिलांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. गौरीच्या वडिलांचा आक्रोश पाहून मन सुन्न झालं. अनंत गर्जे, त्याची आई, नणंद यांच्यावर गुन्हा आहेच, पण त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये असलेली महिला मोकाट राहू नये,” असे त्यांचे मत आहे. पुढे त्यांनी “भांडणं झाली, संकटं आली तरी आत्महत्या हा पर्याय कधीच नाही” असेही म्हटले.
प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून अनंत गर्जेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. ननंद आणि दीराविरुद्धही तपास सुरू असून लवकरच पुढील कारवाई अपेक्षित आहे. गौरीची आत्महत्या की घातपात यातून काय निष्पन्न होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
--------------------------------------------------------
