ज्वालामुखीच्या राखेमुळे अनेक राज्यांवर परिणामाची चर्चा !

 

वायू गुणवत्तेवर परिणाम नसल्याचे IMDचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : इथियोपियातील अफार प्रदेशात तब्बल 10,000 वर्षांपासून निष्क्रिय असलेला हेली गुब्बी ज्वालामुखी अचानक फाटल्याने जगभरातील हवामान आणि आपत्ती तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी उसळलेल्या या ज्वालामुखीतून अंदाजे 15 किलोमीटर उंचीपर्यंत राखेचे प्रचंड ढग निर्माण झाले असून ते भारताच्या दिशेने सरकले आहेत. 

सोमवारी रात्री हे ढग दिल्लीपर्यंत पोहोचले आणि गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब व हरियाण्याकडेही पुढे सरकले. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार हे ढग आता चीनच्या दिशेने जात असून मंगळवार संध्याकाळपर्यंत भारताच्या क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर पडण्याची शक्यता आहे. या राखेच्या ढगांमुळे काही शहरांमध्ये हवाई वाहतुकीवर परिणाम झाला, दृश्यता कमी झाली; मात्र दिल्लीतील वायू गुणवत्तेवर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.

 IMDचे महासंचालक एम. महापात्र यांच्या मते राखेचे कण वातावरणाच्या वरच्या स्तरावर असल्यामुळे जमिनीवरील हवेच्या गुणवत्तेत बिघाड होणार नाही. काही भागात तापमानात किरकोळ वाढ जाणवू शकते. या ढगांमध्ये सल्फर डायऑक्साइड आणि सूक्ष्म काचेसारखे कण असले तरी ते वरच्या स्तरावर असल्याने तत्काळ AQI वर परिणाम होणार नाही. 

सीपीसीबीच्या समीर ॲपवरील आकडेवारीनुसार दुपारी दोन वाजता दिल्लीचा AQI 356 नोंदवला गेला आणि तो ‘खूप खराब’ श्रेणीत कायम राहिला. दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.


 ----------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने