दरवर्षी जवळपास 1 लाख नव्या अग्निवीरांची भरती

 


 भरतीत मोठी वाढ… भारतीयसेनेची तयारी

नवी दिल्ली : भारतीय सैन्य आगामी वर्षापासून अग्निवीर भरतीत मोठी वाढ करण्याच्या तयारीत असून दरवर्षी सुमारे 1 लाख नव्या अग्निवीरांना प्रवेश दिला जाणार आहे. सध्या सैन्यात अंदाजे 1 लाख 80 हजार सैनिकांची कमतरता आहे. कोरोना काळात सलग दोन वर्षे भरती प्रक्रिया बंद असल्याने जवान निवृत्त होत गेले, परंतु नवीन भरती न झाल्याने ही तूट सातत्याने वाढत गेली. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून भरती सुरू झाली असली तरी कमतरता भरून काढण्यासाठी ती अपुरी ठरत होती.

2022 मध्ये अग्निपथ योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात केवळ 40 हजार अग्निवीर घेतले गेले होते. त्यानंतर 2022 ते 2025 अखेरपर्यंत एकूण 1 लाख 75 हजार अग्निवीरांची भरती झाली किंवा प्रक्रियेत आहे. मात्र ही भरतीदेखील विद्यमान तूट पूर्ण करण्याइतकी पुरेशी नाही. त्यामुळे 2026 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या बॅचच्या निवृत्तीपूर्वी जवानांची संख्या स्थिर ठेवण्यासाठी भरती मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे.

यासंदर्भात एका वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याच्या मते, सेनेत जितकी कमतरता आहे तितक्याच प्रमाणात नवीन भरती केली जाईल. भरती वाढवताना प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सैन्याच्या ट्रेनिंग सेंटरची क्षमता वाढवण्याचेही काम सुरू आहे, ज्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवारांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देता येईल.

अग्निवीर बनण्याची तयारी करणाऱ्या युवकांसाठी ही निश्चितच मोठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षापासून भरतीची संधी लक्षणीय वाढणार असल्याने देशातील लाखो तरुणांना सेवेची व देशरक्षणाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.


--------------------------------------------------------------




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने