मतदार याद्यांतील घोटाळ्यावर विरोधकांचा हल्लाबोल
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात आज पुन्हा तापमान वाढवणारा प्रसंग घडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, डावे पक्ष आणि अन्य सहयोगी पक्ष यांच्या वतीने मुंबईत “सत्याचा मोर्चा” काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत या मोर्चाद्वारे मतदार याद्यांमधील अनियमिततेविरोधात पुराव्यासह आरोप करण्यात आले.
राज ठाकरे हे या मोर्चासाठी दादरहून लोकलने चर्चगेटपर्यंत पोहोचले. मोर्चात राज ठाकरे यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, डावे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या मोर्चाद्वारे विरोधकांनी निवडणूक आयोगावर “बोगस मतदार यादी तयार करून लोकशाही प्रक्रियेवर आघात केल्याचा” आरोप केला.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगावर तीव्र हल्ला चढवला. ते म्हणाले, “नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर 100 हून अधिक लोकांची मतदार नोंदणी आहे, तर एकाचा पत्ता सुलभ शौचालय दाखवला आहे. काय बसल्या बसल्या सही घेतली का? हे आयोगाने स्पष्ट करावे. मतदार याद्या स्वच्छ करा आणि मगच निवडणुका घ्या. एक वर्ष लागलं तरी चालेल पण निष्पक्ष निवडणुका हव्या.” त्यांनी लोकशाहीच्या पारदर्शकतेवर भर देत म्हटलं, “मतदार उन्हातान्हात उभा राहून मतदान करतो, पण निकाल जर चुकीचा लागला तर त्याचा अपमान आहे. ही मॅच फिक्सिंग थांबली पाहिजे.”
शरद पवार यांनी आपल्या भाषणात इतिहासाची आठवण करून दिली आणि सत्ताधाऱ्यांवर रोख टाकला. “देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आज खोटेपणा उघड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, याचा अर्थ शासन त्यांना संरक्षण देत आहे. मतदारांचा अधिकार टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे,” असं पवार म्हणाले. त्यांनी प्रशासनावर आरोप करत सांगितले की, “काहींनी बोगस आधार कार्ड तयार केल्याच्या तक्रारी केल्या, पण जे लोक हा घोटाळा उघड करत आहेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत.”
उद्धव ठाकरे यांनीही केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, “आज लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. मतदार याद्यांमधील गोंधळ हा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास कमी करणारा आहे. या देशात आता निवडणुका खऱ्या अर्थाने निष्पक्ष राहिल्या नाहीत. आम्ही फक्त निवडणूक आयोगाकडे न्याय मागतो आहोत.”
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकत्र असल्याचं सांगितलं. “हा मोर्चा राजकीय नसून लोकशाहीचा आहे. मतदार यादी स्वच्छ होणं म्हणजे जनतेच्या विश्वासाचा विजय,” असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, या मोर्चावर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “मतदार याद्यांतील चुका दुरुस्त करण्याचं काम निवडणूक आयोग करत आहे. हे राजकीय स्टंटबाजी आहे. हे सर्व लोक शक्ती प्रदर्शनासाठी मोर्चा काढत आहेत.” तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पलटवार करत म्हटलं, “याकूब मेमनची फाशी रद्द करावी असं सांगणाऱ्या महापुरुषांच्या अबु आझमी, नसिम खान, आणि अमिन पटेल यांच्या मतदारसंघातील यादी तपासा. त्यांच्या मतदार यादीत हजारो बांग्लादेशी आणि रोहिंग्या मतदार सापडतील.”
या संपूर्ण प्रकरणावरून राज्यातील राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. “सत्याचा मोर्चा” हा निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी लढा देणारा आंदोलन ठरला असला, तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका आता आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
