मुलांच्या साखरपुड्यापूर्वीच व्याहीसह फरार झाली विहीन !

 

आगळीवेगळी प्रेमकहाणी ऐकून पोलीसही थक्क 

उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील बडनगर भागात घडलेल्या एका अनोख्या प्रेमकहाणीने सर्वांना अचंबित केले आहे. ४५ वर्षीय विवाहित महिला आपल्या ५० वर्षीय प्रियकरासह घरातून फरार झाली असून तपासानंतर जेव्हा सत्य बाहेर आलं, तेव्हा पोलीसही थक्क झाले. कारण ती महिला ज्या पुरुषासोबत गेली होती, तो तिचा होणारा व्याही निघाला.

घटनेनुसार, बडनगर तालुक्यातील ऊंटवासा गावातील ४५ वर्षीय महिला आठ दिवसांपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेच सापडली नाही. शेवटी कुटुंबीयांनी बडनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आठ दिवसांनी महिलेचा शोध लावला आणि तिला सुरक्षितपणे परत आणले.

महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता तिच्या उत्तरांनी अधिकारी सुद्धा गोंधळले. तिने स्पष्ट सांगितले की, ती आता आपल्या नवऱ्याकडे किंवा मुलांकडे परत जाणार नाही, तर आपल्या प्रियकरासोबतच राहणार आहे. तपासात उघड झाले की महिलेचा प्रियकर उज्जैनजवळील चिकती गावचा रहिवासी आहे आणि दोघांमध्ये काही महिन्यांपासून जवळीक वाढली होती.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्या महिलेच्या मुलाची साखरपुडा त्या पुरुषाच्या मुलीशी ठरलेला होता. म्हणजेच, साखरपुड्यापूर्वीच विहीन आणि व्याही दोघे प्रेमात पडले आणि समाजाच्या बंधनांना धुडकावून त्यांनी एकत्र पळून जाण्याचा निर्णय घेतला.

बडनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अशोक पाटीदार यांनी सांगितले की, संबंधित महिला विवाहित असून तिला दोन तरुण मुले आहेत. ती हरवल्याची तक्रार मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आणि अखेर दोघांनाही शोधण्यात यश आले. तथापि, हा मामला पूर्णपणे वैयक्तिक असल्याने आणि दोघांची संमती असल्यामुळे पोलिसांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. महिलेच्या कुटुंबाला ती सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ही घटना जणू १९८१ साली आलेल्या ‘प्रेमगीत’ या चित्रपटातील सुप्रसिद्ध ओळींप्रमाणेच आहे “न वयाची मर्यादा, न नात्याचे बंधन...” जिथे प्रेमाने समाजाच्या चौकटी मोडून दोघांना एकत्र आणले, आणि या अनोख्या कहाणीने संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे.





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने