राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा वाढलेलेच
मुंबई : यंदा नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे गारठा नाही, तर उष्ण आणि ओलसर हवामानाचा अनुभव येणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत जास्त राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी राहील. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने महासंचालक नोव्हेंबर महिन्यासाठी तापमान व पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यां नुसार, वायव्य भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश प्रदेशांत किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. याचबरोबर, नोव्हेंबरमध्ये देशाच्या अनेक भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
दक्षिण भारतात या काळात साधारणपणे ७७ ते १२३ टक्के पाऊस पडतो, ज्याला सामान्य पाऊस मानला जातो. मात्र, यंदा या भागात पावसाची तीव्रता थोडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील याचा परिणाम दिसेल, त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात थंडीऐवजी ढगाळ हवामान आणि अधूनमधून पावसाची रिपरिप अनुभवता येईल.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात किमान तापमान वाढणार, पण कमाल तापमान सरासरीपेक्षा किंचित कमी राहणार आहे. त्यामुळे दिवस उबदार आणि रात्री उष्णतेच्या वातावरणात जाणवणारी दमट हवा अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा ५ टक्के अधिक पाऊस (७७.७ मिमी) नोंदवला गेला. कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरी इतकाच पाऊस पडला.
दरम्यान, मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलक्या सरींचा सिलसिला सुरू आहे. शनिवारी पहाटेपासून शहर आणि उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना नोव्हेंबरमध्येही पावसाळ्याची आठवण झाली आहे.
