एंटीमायक्रोबियल अवेअरनेस वीकची सुरूवात होताच जगभरात अँटिबायोटिक औषधांच्या अनियंत्रित वापराबाबत पुन्हा गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2015 पासून एंटी मायक्रोबियल रेजिस्टन्स म्हणजेच एएमआरच्या धोक्याबाबत सतत जागरूकता मोहीम राबवली असली तरी परिस्थिती अधिकच गंभीर होत चालल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सायन्स डायरेक्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, एएमआर हा 2050 पर्यंत जगातील सर्वाधिक मृत्यूंचे प्रमुख कारण ठरू शकतो.
अनेक वेळा लोक सर्दी, ताप किंवा किरकोळ संसर्गामध्ये स्वतःहून अँटिबायोटिक्स घेतात आणि गरजेपेक्षा जास्त औषधांचा वापर करतात. परिणामी शरीरातील जीवाणूंवर औषधांचा परिणामच होत नाही आणि त्यांच्यात प्रतिकारशक्ती विकसित होते.
तज्ज्ञांच्या मते, गरजेपेक्षा जास्त किंवा अयोग्यरीत्या घेतलेल्या अँटिबायोटिक्समुळे जीवाणू अधिक शक्तिशाली होतात आणि त्यांच्यावर कोणतीही औषधे परिणाम करत नाहीत. डब्ल्यूएचओच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 12.7 लाख मृत्यू हे थेट एएमआरमुळे झाले तर 49.5 लाख मृत्यूंना एएमआर हा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरला. त्यामुळे जगभरात याला 'सायलेंट पँडेमिक' असे संबोधले जात आहे.
भारतामध्येही ही समस्या झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी अब्जावधी अँटिबायोटिक डोस वापरले जात असून, लॅन्सेट ई-क्लिनिकल मेडिसिनच्या एका अहवालानुसार देशातील 83 टक्के रुग्णांमध्ये मल्टी ड्रग रेजिस्टन्स ऑर्गनिझम अर्थात एमडीआरओ आढळले आहेत. याचा अर्थ साधारण अँटिबायोटिक औषधांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.
एंडोस्कोपिक प्रक्रियेनंतरही भारतात एमडीआरओचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. भारतात 83 टक्के रुग्णांमध्ये हे जीवाणू आढळतात, तर इटलीमध्ये 31.5, अमेरिकेत 20.1 आणि नेदरलँडमध्ये केवळ 10.8 टक्के प्रकरणांमध्ये अशी स्थिती दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती रुग्णांसोबत देशाच्या आरोग्य व्यवस्थेलाही मोठे संकट निर्माण करणारी आहे. डब्ल्यूएचओनेही दक्षिण-पूर्व आशियाला ज्यात भारत समाविष्ट आहे एएमआरने सर्वाधिक प्रभावित प्रदेशांमध्ये गणले आहे.
डॉक्टरांनी याबाबत गंभीर इशारा देताना सांगितले की, प्रत्येक आजारात अँटिबायोटिक्स गरजेच्या नसतात. अनेक वेळा वायरल ताप किंवा सर्दी-खोकला हे दोन ते तीन दिवसांत स्वतःच बरे होतात. मात्र रुग्ण स्वतःहून औषधे घेणे, पूर्ण कोर्स न पाळणे किंवा चुकीच्या डोसमध्ये औषधांचा वापर करणे यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते.
तज्ज्ञांच्या मते, जर आत्ताच योग्य पावले उचलली नाहीत तर पुढील काही वर्षांत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आहे. एएमआरचा वाढता धोका हे भविष्यातील सर्वात मोठे आरोग्य संकट ठरू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविना अँटिबायोटिक्स घेण्याचे टाळावे आणि कोणतेही औषध वापरताना वैद्यकीय मार्गदर्शनाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
