Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

घाटंजीच्या गुजराती नवरात्र उत्सव मंडळाची हीरक महोत्सवी वाटचाल

Gujrati garba in ghatanji yavatmal

 घाटंजी : शहरातील नवरात्रीला आपला वेगळा ठसा उमटवणारे गुजराती नवरात्र उत्सव मंडळ यंदा आपल्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. हा प्रवास फक्त धार्मिक परंपरेचा नसून, घाटंजीतील गुजराती समाजाच्या सांस्कृतिक एकतेचा आणि परंपरांचे जतन करण्याचा आहे.

 या उत्सवाची सुरुवात १९५० साली झाली. रतिलाल रायचुरा आणि त्यांची पत्नी बच्चुबेन यांनी संत मारोती महाराज वॉर्ड येथील आपल्या वाड्यात घटस्थापना करून पहिल्यांदाच घाटंजीत गुजराती पद्धतीने नवरात्र साजरी केली. त्या वेळी अवघ्या १५ ते २० गुजराती परिवारांनी मिळून हा उत्सव साजरा केला. नंतर काही वर्षांनी कन्या शाळेजवळील पिंपळाच्या झाडाखाली घटस्थापना करण्यात आली.
 १९५८ साली घटस्थापनेचे ठिकाण धर्मशाळेत हलवण्यात आले. तेथे तब्बल ३८ वर्षे हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होत राहिला. त्या काळात फक्त काही मोजक्या ठिकाणी गरबा आयोजित केला जायचा. शेवटी १९९७ साली जलाराम मंदिरासाठी जागा घेऊन घटस्थापनेला कायमस्वरूपी स्थळ मिळाले. या मंदिर उभारणीसाठी स्व. हेमराज गंडेचा, स्व. केशवलाल गंडेचा आणि स्व. मगनलाल गढिया यांच्यासह अनेकांचे मोठे योगदान आहे.
 गुजराती नवरात्र उत्सव मंडळाची अधिकृत नोंदणी गोपाल अटारा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी मंडळात उपाध्यक्ष मुकेश गंडेचा, सचिव प्रदीप सुचक तसेच अनेक मान्यवर सदस्य होते. आज शहरातील जवळपास १०० गुजराती परिवार या उत्सवात सहभागी होतात. दिवसभर आपापल्या व्यवसायात व्यस्त राहिल्यानंतर रात्री सर्वजण जलाराम मंदिरात एकत्र येतात आणि गरबा-दांडियाचा जल्लोष करतात.
 या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे रेकॉर्डेड गाण्यांवर नव्हे तर स्थानिक गायक-वादकांच्या थेट सादरीकरणावर गरबा नृत्य केले जाते. पारंपरिक गाण्यांच्या तालावर सर्व वयोगटातील महिला-पुरुष दांडियाचा आनंद लुटतात. अष्टमीच्या दिवशी हातात दिवे घेऊन खेळला जाणारा गरबा हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते.
 पूर्वी रात्रभर सुरू राहणारे कार्यक्रम आता वेळेच्या बंधनामुळे ठराविक वेळेत संपवावे लागतात. तरीही उत्साह आणि आनंद मात्र तसूभरही कमी झालेला नाही. उलट वर्षागणिक उत्सवात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad