लाचलुचपत विभागाचा सापळा यशस्वी
जालना : शहरात प्रशासनातील मोठा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. या घटनेने जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एका कंत्राटदाराचे बांधकामाचे बिल अडकले होते. ते बिल पास करण्याच्या बदल्यात आयुक्तांनी दहा लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि खांडेकर यांना कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानी झडती सुरू केली असून, त्याठिकाणी विविध कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे समजते. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
पालिकेच्या आयुक्तांच्या अटकेने जालना महापालिकेत मोठा भूकंप झाला असून, प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांमध्येही एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढे कोणावर कारवाई होते आणि अधिक तपशील काय समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.