देशातील औषधांचा परिणाम संपत चालला
नवी दिल्ली : प्रदूषणाचा प्रचंड कहर आणि दिवाळीच्या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढलेला असतानाच भारतात अँटिबायोटिक्सचा बेफाम आणि बिनधास्त वापर सुरू आहे. त्यात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक औषधे परस्पर घेण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, हेच "अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स" (एएमआर) या नव्या आरोग्यसंकटाचे मोठे कारण ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत औषध दुकानदारांकडून थेट औषधे घेणाऱ्यांची आणि इंटरनेटवरून उपचार करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ताप, सर्दी, खोकला किंवा किरकोळ आजार दिसताच लोक अँटिबायोटिक्स घेतात. परिणामी जीवाणू मरत नाहीत ते अधिक शक्तिशाली बनतात! या संदर्भात तज्ञांचे म्हणणे आहे की, “रुग्ण औषधे अर्धवट थांबवतात. यामुळे जीवाणूंना प्रतिकारशक्ती मिळते आणि त्याच औषधांचा पुढे काहीही परिणाम होत नाही.”
या चुकीच्या सवयीमुळे आधी सहज बरे होणारे टायफॉईड, न्यूमोनिया, मूत्रमार्ग संसर्ग यांसारखे आजार आता अधिक धोकादायक स्वरूप घेत आहेत. अनेक बॅक्टेरिया नियमित औषधांना प्रतिसाद देत नाहीत. फार्मसीत सहज मिळणारी "ओटीसी" औषधे आणि ऑनलाइन सेल्फ-ट्रीटमेंटने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ‘ग्लास’ सर्वेक्षणानुसार भारतातील अनेक बॅक्टेरिया आता पारंपरिक अँटिबायोटिक्सला प्रतिसाद देत नाहीत म्हणजेच औषधांचा परिणाम संपत चालला आहे.
तज्ञांचे तज्ञांचे मत आहे की, “अँटिबायोटिक्स व्हायरल आजारांवर उपयोगी नसतात”, पण तरीही लोक ताप, सर्दी, खोकल्यावर त्यांचा वापर करतात. यामुळे पुढे हॉस्पिटलमध्ये उपचार अधिक कठीण होतात. लहान शहरांतील हॉस्पिटल्समध्ये संक्रमण नियंत्रणासाठी साधनसामग्री अपुरी आहे; हात स्वच्छतेचा अभाव आणि अँटिबायोटिकच्या चुकीच्या वापरामुळे एएमआरचा धोका दुप्पट वाढतो.
भारत सरकार एएमआरविरुद्धच्या जागतिक मोहिमेत सक्रिय असले तरी केवळ धोरण पुरेसे नाही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. बॅक्टेरियल संसर्गातच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे, पूर्ण कोर्स पाळणे, आणि स्वच्छतेची सवय लावणे हे अत्यावश्यक आहे.
डॉक्टरांचे स्पष्ट आवाहन आहे “थोडं बरं वाटतंय म्हणून औषध अर्धवट सोडू नका. यामुळे तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया अधिक शक्तिशाली बनतात. तर पुढे हे साधे संक्रमणही जीवघेणे ठरतील.”
जर आजच या सवयींना आळा घातला नाही, तर उद्याचा भारत ‘अँटिबायोटिक-प्रूफ’ बनेल जिथे साधी सर्दीही जीवघेणी ठरू शकते. वेळ आली आहे. स्वउपचार थांबवा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि एएमआरला आळा घाला कसे आवाहन करण्यात आले आहे !
