मथळा वाचून वाचकांना प्रश्र पडला असेल,की विधान परिषदेचे 'गणिकायण' हा काय प्रकार आहे? आपल्या देशात लोकप्रतिनिधींचे सभागृह असलेल्या संसदेच्या पहिल्या सभागृहात निवडूनआलेल्या खासदारांपैकी कीती जणांवर बलात्कार, चोरी,खून,दरोडे, विनयभंग,आणि विविध प्रकारच्या आरोपावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याची आकडेवारी एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस नावाच्या संस्थेने प्रसिद्ध केली आहे. सभागृहात सभासद किती अश्लील आणि चार चौघात बोलता येणार नाही अशाही शब्दांचे प्रयोग करतात आणि ते शब्द पीठासीन अधिकारी किंवा कामकाजातून काढून टाकतात.अशा शब्दांचा एक कोष अर्थात डिक्शनरीच लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केली आहे.गधा,कुत्ता, हरामखोर, रंडी असे काय काय शब्द आहेत याचा अंदाज करवत नाही.
स्वत:ला हाडाचे शिक्षक म्हणवणाऱ्यांना कुणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही केव्हापासून हाडाचे शिक्षक झाले?कोणत्या महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले?कधीही एक सुद्धा तासिका घेतली नाही. पगार मात्र घेतला असेल.अध्यापनाचा अनुभव शून्य तरीही प्राध्यापक म्हणवता? जे खरे हाडाचे शिक्षक आहेत ते अशांना निवडून देणार काय ? हा प्रश्न जोरदार चर्चेत आहे एकंदरीत निवडणुकीचे हे सारे शिक्षणव्यवस्थेला कुठे नेऊन जाणार हा चिंतेचा विषय आहे.
लोकांना मात्र आता त्याचे काही नवल वाटत नाही. हेच आपले प्राक्तन आहे.अशी लोकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळेच की काय घटनाकारांनी विधिमंडळाच्या दुसऱ्या सभागृहात विद्वान लोकांचे,विविध व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व असावे यासाठी तरतुदी केल्या आहेत.घटक राज्यात विधान परिषदेची तरतूद त्यातूनच निर्माण झाली आहे.महाराष्ट्रात विधान परिषद आहे. विधान परिषदेत शिक्षकांचे आणि पदवीधरांचे प्रत्येकी सात प्रतिनिधी असतात.या दोन्ही मतदारसंघात राजकीय पक्षांनी लुडबूड करू नये ही जी घटनाकारांची भावना होती तिला हरताळ फासला गेला.आता हाच प्रश्न आहे की,संस्थाचालक शिक्षण संस्थेत शिक्षकांची कर्मचाऱ्यांची प्राध्यापकांची नोकर भरती करताना किती लाख रुपये घेतात हे आता लपून राहिलेले नाही.नीतीमत्तेचीची ज्यांना अजिबात चाड नाही त्यांच्याकडून शिक्षणक्षेत्रात घडेल अशी भाबडी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
मात्र त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात जे प्रकार घडत आहेत ते लक्षात घेतले म्हणजे आम्ही कोणत्या पातळीवर आलो आहोत याची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही.उमेदवारी देताना राजकीय पक्ष प्रचंड प्रमाणात पैसे घेऊन उमेदवारी देतात अशी सतत चर्चा असते. याही मतदार संघात होणारी चर्चा अनाठायी आहे हे म्हणणे धाडसाचे ठरेल.विधान परिषदेतील बहुमताच्या आधारे सरकारचे भवितव्य ठरत नाही.असे असताना राजकीय पक्ष या मतदार संघात कशासाठी निवडणूक लढतात या प्रश्नाचे एक उत्तर असे की राजकीय पक्षांना कोणत्याही निवडणुका म्हणजे एक प्रकारची नशा असते. सत्ता आणि संपत्तीचा माज या आधारावर ही नशा इतकी चढते की मग कोणत्याही नीतिमूल्यांची चाड त्यांना उरत नाही.मोहरमच्या यात्रेत ज्याप्रमाणे अंगाला रंगपट्टी करून नकली वाघ नाचत असतात तशीच ही नाचण्याची नशा असते.स्वाभाविकच गुण नाही पण वाण लागला प्रमाणे शिक्षकां सारखा मतदार संघ आणि त्या मतदार संघात झालेले प्रकार अत्यंत लज्जास्पद आहेत.पैठणी, पासून तर चांदीच्या वाट्या आणि पाकिटामध्ये पैसे घालून ते मतदारांना वाटणे असे प्रकार झाले. या प्रकारात सहभागी असलेल्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर काही लोकांना अटकही झाली आहे.शिक्षक मतदार संघात हे सारे प्रकार व्हावेत या इतकी लाजिरवाणी गोष्ट नाही.तुकाराम महाराज म्हणतात,
'ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा'
शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी जेव्हा सभागृहात निवडून जात,मग ते कोणत्याही विचारांचे असोत, त्यांच्यात "मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास
कठिण वज्रास भेदु ऐसे
भले तरीं देउ कासेची लंगोटी
नाठाळांच्या माथी हाणु काठी" हे सभागृहात सरकारला ठणकावून सांगण्याची हिंमत होती.आता मात्र सारे चित्र बदललेले आहे. मूल्यांशी तडजोड न करणारे काही अपवादात्मक ऊमेदवार उभे आहेत. पण सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज यापुढे हतबोल होण्याशिवाय पर्याय नसला तरी मतदारांमध्ये मात्र न्याय देण्याची ताकद आहे, त्यांच्याजवळ नीरक्षीर विवेक आहे हा भरवसा असल्याने ते प्राणपणाने लढत असावेत.
विधी निर्मितीच्या कार्यात विद्वान आणि शिक्षण तज्ञ त्यांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा घटनाकारांनी प्रदीर्घ चर्चेनंतर राज्यांच्या विधीमंडळात नावाच्या दुसऱ्या पण वरिष्ठ सभागृहाची निर्मिती केली विधान परिषदेचे अस्तित्व त्या त्या राज्यांच्या विधानसभांच्या मर्जीवर सोडले.हेतू हा की विधान परिषदेत कायद्याच्या निर्मितीत व्यावसायिक घटकांचे प्रतिनिधित्व असावे त्यासाठी पदवीधरांचा आणि शिक्षकांचा मतदार संघ निर्माण केले.काही वर्षेपर्यंत पदवीधर आणि शिक्षक या मतदारसंघातील प्रतिनिधित्व हे अत्यंत दर्जेदार आणि लोकशाहीची आब राखणारे होते.मात्र अलीकडच्या काळात सत्ता आणि संपत्तीचा माज पडलेल्यांनी याही मतदार संघात पदार्पण करून सारी लोकशाही राजकीय व्यवस्था नासवून टाकली.शिक्षक मतदार संघात आतापर्यंत कधीही राजकीय पक्ष घुसला नव्हता.या मतदारसंघातील सात उमेदवार निवडून आले काय आणि पडले काय,काही फरक विधानसभेत पडत नाही. सरकारवर त्याचा परिणाम होत नाही.तरीही या मतदार संघात राजकीयपक्षांनी का घुसावेहा प्रश्न यावेळी चर्चेत आला. उत्तर असे दिसते ते म्हणजे राजकीय पक्षांना २४ तास निवडणुकीची नशा बसलेली असते.भ्रष्ट मार्गाने कमावलेली अब्जावधी रुपयांची संपत्ती ते पाण्या सारखी करवाहवतात.ही लागण मग इतर उमेदवारांमध्ये पसरते .पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात उमेदवारी देताना कोणते निकष या पक्षांनी पहिले असा प्रश्न केला तर मन सुन्न होऊन जाते.

