एकाचा मृत्यू
८ जणांची कोरोनावर मात
यवतमाळ : जिल्ह्यात आज पुन्हा ४० पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे तर पूसद शहरातील श्रीरामपूर येथील ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटीव्ह आलेले ८ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ४० जणांमध्ये २५ पुरुष व १५ महिला आहे. यात दिग्रस येथील पाच पुरूष व तीन महिला, पुसद येथील पार्वतीनगरातील एक महिला, पुसद येथील तीन पुरुष व एक महिला, वणी येथील एक पुरूष, पांढरवकडा येथील अकरा पुरूष व दोन महिला, यवतमाळ शहरातील साईनाथ लेआऊट येथील एक पुरूष, यवतमाळ येथील दोन पुरूष व तीन महिला, दारव्हा येथील एक पुरूष व पाच महिला, तर आर्णी येथील एक पॉझिटीव्ह पुरूषाचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज ४० नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत १०९७८ नमुने पाठविले असून यापैकी १०५५७ प्राप्त तर ४२१ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात ९८६८ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.जिल्ह्यात बुधवारपर्यंत १८७ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह होते. यात ४० जणांची भर पडल्याने हा आकडा २२७ वर पोहचला. तर पुसद येथील १ महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा अहवाल आल्याने ही संख्या २२८ होऊन परत २२७ झाली होती. मात्र ‘पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ८ जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २१९ झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे १४४ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटीव्ह आलेले ७५ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ६८९ झाली आहे. यापैकी ४४८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण २२ मृत्युची नोंद आहे.
