सकाळी रिकाम्या पोटी चहा, कॉफी, फळांचा रस, आंबट फळे आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने काही लोकांना ॲसिडिटी, गॅस आणि पचनाचे त्रास होऊ शकतात. कोणते पदार्थ टाळावेत आणि दिवसाची सुरुवात कशाने करावी, जाणून घ्या.
सकाळची सुरुवात कशी होते, यावर अनेकदा संपूर्ण दिवसाची तब्येत आणि ऊर्जा अवलंबून असते. रात्री अनेक तास उपाशी राहिल्यानंतर सकाळी पोट अधिक संवेदनशील असते. त्यामुळे दिवसातील पहिला आहार योग्य असणे आवश्यक मानले जाते. अनेक जण उठताच चहा, कॉफी किंवा फळांचा रस घेतात. काही जण नाश्त्यामध्ये तिखट किंवा आंबट पदार्थ खातात. हे पदार्थ प्रत्येकासाठी हानिकारक असतात असे नाही, मात्र काही लोकांमध्ये यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोट फुगणे, जळजळ किंवा अपचनाचा त्रास वाढू शकतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीची पचनसंस्था वेगळी असते. त्यामुळे सकाळी काय खावे किंवा काय टाळावे यासाठी एकच नियम सर्वांवर लागू होत नाही. तरीही काही पदार्थ रिकाम्या पोटी घेताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो, विशेषतः ज्यांना ॲसिडिटी, गॅस्ट्रिक किंवा पचनाशी संबंधित समस्या वारंवार जाणवतात.
१. रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा - अनेकांची सकाळ चहाशिवाय सुरू होत नाही. मात्र रिकाम्या पोटी चहा पिल्यास त्यातील कॅफीन आणि टॅनिनमुळे काही लोकांमध्ये पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे ॲसिडिटी, मळमळ, गॅस किंवा पोटात जळजळ होण्याची शक्यता वाढते. पचनाचा त्रास असणाऱ्यांनी चहा पिण्यापूर्वी हलका आहार घेणे अधिक योग्य ठरू शकते.
२. कॉफीमुळे वाढू शकतो त्रास - कॉफी ही अनेकांची आवडती सकाळची पेय असली तरी रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यास काही व्यक्तींमध्ये पोटातील आम्लनिर्मिती वाढू शकते. त्यामुळे छातीत जळजळ, अस्वस्थता किंवा पोट बिघडण्याचा त्रास जाणवू शकतो. विशेषतः ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रिकचा त्रास असलेल्या व्यक्तींनी याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
फळांचा रस नेहमीच सर्वोत्तम पर्याय नसतो - फळांचा रस आरोग्यदायी मानला जात असला तरी रिकाम्या पोटी तो प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच असे नाही. रसामध्ये तंतुमय घटक कमी आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काही लोकांमध्ये रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते किंवा लवकर भूक लागू शकते. त्यामुळे शक्य असल्यास रसाऐवजी संपूर्ण फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
४. आंबट फळे काळजीपूर्वक खावीत - संत्री, मोसंबी, अननस यांसारखी फळे व्हिटॅमिन 'सी'चा उत्तम स्रोत आहेत. मात्र ज्यांना ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांनी ही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास पोटात किंवा छातीत जळजळ वाढू शकते. मात्र निरोगी व्यक्तींमध्ये ही फळे सामान्यतः सुरक्षित आणि पौष्टिक मानली जातात.
५. तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळणेच योग्य - सकाळी रिकाम्या पोटी अतितिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास पोटाच्या आतील आवरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गॅस, पोटदुखी, जळजळ आणि अपचनाचा त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हलका, संतुलित आणि सहज पचणारा आहार अधिक योग्य मानला जातो.
मग सकाळी काय खावे? - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळच्या आहारात सहज पचणारे आणि शरीराला आवश्यक पोषण देणारे पदार्थ असावेत. त्यासाठी भिजवलेले बदाम, ताजी फळे, दही, मोड आलेली कडधान्ये, अंडी, ओट्स, मूग चिल्ला, पोहे किंवा इतर हलका आणि संतुलित नाश्ता चांगला पर्याय ठरू शकतो. हे पदार्थ शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच पचनसंस्थेचे आरोग्यही चांगले ठेवण्यास मदत करतात.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सकाळी कोणता आहार घ्यायचा हे प्रत्येकाच्या आरोग्यस्थिती, जीवनशैली आणि पचनशक्तीवर अवलंबून असते. मात्र जर वारंवार ॲसिडिटी, गॅस, पोटदुखी किंवा जळजळ होत असेल, तर सकाळच्या खाण्याच्या सवयींचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. योग्य आहाराची निवड केल्यास पचन सुधारण्यास, दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि एकूणच आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.
°°°°°