म्हाडा मुंबई मंडळाच्या २६४० सदनिकांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ६० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज करण्याची मुदत १४ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मुंबई : म्हाडा मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित करण्यात आलेल्या संगणकीय सोडतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण ६० हजार ५५६ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४१ हजार ९० अर्ज अनामत रकमेसह दाखल झाले आहेत. वाढता प्रतिसाद लक्षात घेता अधिकाधिक इच्छुकांना संधी मिळावी यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत १४ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.
म्हाडा मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार अर्जदारांना १४ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून १५ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाईन भरता येणार आहे. तसेच १५ मे रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS आणि NEFT द्वारेही अनामत रक्कम जमा करता येणार आहे.
सोडतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची प्रारूप यादी २२ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर २५ मेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन दावे आणि हरकती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असेल. अंतिम पात्र अर्जदारांची यादी २९ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून ५ जून २०२६ रोजी संगणकीय सोडतीद्वारे सदनिकांचे वितरण जाहीर केले जाणार आहे. सोडतीचे स्थळ लवकरच घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.
मुंबई मंडळाने ३० मार्च २०२६ रोजी ही सोडत जाहीर केली होती. या सोडतीत विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर, वडाळा, पवई, माझगाव आणि गिरगावसह मुंबईतील विविध भागांमधील सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी १४०८ तर उच्च उत्पन्न गटासाठी २२९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सोडतीत म्हाडाकडून बांधकाम सुरू असलेल्या १७६२ सदनिकांसह पुनर्विकास प्रकल्पांतून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या सदनिकांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच मागील सोडतींमध्ये रिक्त राहिलेल्या सदनिकादेखील नव्या सोडतीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली आहे. पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या किंमतींपेक्षा सुधारित दर कमी करण्यात आले असून अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पातील प्रत्येक सदनिकेसोबत एक वाहनतळ विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही मंडळाने दिली आहे.
म्हाडाने नागरिकांना फक्त अधिकृत संकेतस्थळ आणि IHLMS 2.0 Integrated Mhada Housing Lottery System या अधिकृत मोबाइल ॲपद्वारेच अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही दलालांच्या किंवा फसव्या प्रलोभनांच्या आहारी जाऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सोडतीविषयी अधिक माहितीसाठी माहिती पुस्तिका आणि अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांक ०२२-६९४६८१०० वर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
°°°°°°