वर्षभरात चांदीत तिप्पट उसळी; दर अडीच लाखा जवळ !

 

Sikver





चांदी आयातीत भारत ठरला जगात अव्वल

२०२५ मध्ये भारतात चांदीच्या किमतीत जवळपास तिप्पट वाढ झाली असून दर अडीच लाख रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. औद्योगिक मागणी वाढल्याने भारत जगातील सर्वात मोठा चांदी आयातदार ठरला आहे.

मुंबई : मागील वर्षभरात चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ नोंदवली गेली असून भारतातील चांदीचा दर जवळपास तिप्पट झाला आहे. जानेवारी २०२५ मध्ये प्रतिकिलो ८० हजार ते ८५ हजार रुपयांच्या आसपास असलेली चांदी जानेवारी २०२६ मध्ये थेट २.४३ लाख रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. या प्रचंड वाढीमुळे गुंतवणूकदारांसह औद्योगिक क्षेत्राचेही लक्ष चांदीकडे वळले आहे.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, औद्योगिक मागणीत झालेली मोठी वाढ, जागतिक भू-राजकीय तणाव आणि पुरवठ्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे चांदीला आता धोरणात्मक धातू म्हणून अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चांदी केवळ पारंपरिक मौल्यवान धातू न राहता आधुनिक औद्योगिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनत चालली आहे.

या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भारत सध्या रिफाइंड चांदीचा जगातील सर्वात मोठा आयातदार ठरला आहे. २०२५ या वर्षात भारताने सुमारे ९.२ अब्ज डॉलर किमतीची चांदी आयात केली असून, किंमती मोठ्या प्रमाणात वाढूनही चांदीची आयात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ४४ टक्क्यांनी अधिक झाली आहे. यावरून देशांतर्गत मागणी किती प्रचंड आहे, हे स्पष्ट होते.

GTRI च्या अहवालानुसार, चांदीच्या किमतीतील ही तीव्र वाढ केवळ भू-राजकीय संघर्ष किंवा व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईसारख्या घटनांमुळे झालेली नाही, तर जागतिक मागणीच्या रचनेत झालेल्या जलद बदलांमुळेही आहे. सध्या जगभरात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आज जगातील एकूण चांदीपैकी ५० टक्क्यांहून अधिक वापर औद्योगिक क्षेत्रात होत आहे. त्यामध्ये सौर ऊर्जा क्षेत्राचा मोठा वाटा असून जागतिक चांदीच्या मागणीपैकी सुमारे १५ टक्के मागणी ही सौर ऊर्जा उद्योगाकडून येते. २००० सालापासून शुद्ध चांदीची जागतिक मागणी जवळपास आठ पट वाढली आहे, हे चांदीचे बदलते महत्त्व अधोरेखित करते.

मात्र, वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा पुरेसा वाढताना दिसत नाही. या क्षेत्रात चीनचे वर्चस्व असून तो जगातील सर्वात मोठा चांदी निर्यातदार आहे. तरीही भारत हा चीनकडील चांदीचा सर्वात मोठा आयातदार राहिला आहे. यामुळे भारताची चीनवरील अवलंबित्वाची पातळीही वाढली आहे.

दरम्यान, चीनने चांदीच्या निर्यातीसाठी परवाना अनिवार्य केल्याने जागतिक बाजारात चिंता निर्माण झाली आहे. १ जानेवारीपासून लागू झालेल्या या नियमानुसार प्रत्येक चांदीच्या निर्यात शिपमेंटसाठी चीन सरकारची विशेष परवानगी आवश्यक असणार आहे. तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे जागतिक चांदी पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो आणि भविष्यात चांदीच्या किमतींवर आणखी दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


----------





Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने