प्रयागराज माघ मेळा प्रशासनाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस बजावली आहे. ज्योतिष्पीठाच्या शंकराचार्य पदाबाबत इलाहाबाद उच्च न्यायालयाचा हवाला देत २४ तासांत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
प्रयागराज : माघ मेळा प्रशासनाने ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य असल्याचा दावा करणाऱ्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून २४ तासांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या नोटिशीत इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना स्वतःला ज्योतिष्पीठाचे शंकराचार्य म्हणून सादर करण्याचा अधिकार कसा, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून पट्टाभिषेकाबाबत अंतिम किंवा अंतरिम आदेश दिला जात नाही, तोपर्यंत कोणताही धर्माचार्य स्वतःला ज्योतिष्पीठाचा शंकराचार्य म्हणून घोषित करू शकत नाही. अशा परिस्थितीत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा दावा न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन ठरू शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज माघ मेळ्यात मोठा वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेश सरकारचे गृह सचिव मोहित गुप्ता आणि मेळा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांचा वाद झाला होता. या वादादरम्यान अधिकाऱ्यांकडून शिष्यांशी गैरवर्तन व मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर नाराज झालेल्या अविमुक्तेश्वरानंद यांनी संगम स्नान करण्यास नकार दिला आणि तेव्हापासून ते आपल्या शिबिराबाहेरच ठिय्या मांडून बसले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता मेळा प्राधिकरणाने त्यांना नोटीस बजावल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नोटिशीनुसार, अविमुक्तेश्वरानंद यांनी २४ तासांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करणे बंधनकारक आहे. अन्यथा पुढील प्रशासकीय कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले आहे की, जोपर्यंत अधिकारी स्वतः येऊन माफी मागत नाहीत आणि त्यांना संगम स्नान घडवून आणत नाहीत, तोपर्यंत ते पूर्णिमेपर्यंत शिबिराबाहेरच बसून राहणार आहेत. भविष्यात प्रयागराजला आले तरी शिबिरात न राहता बाहेरच राहू आणि स्नानही करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे प्रयागराज माघ मेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार असून त्या दिवशी अखाड्यांचे अंतिम स्नान पार पडते. २०२६ च्या माघ मेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी संगमात स्नान केले असून दररोज लाखो भाविकांची गर्दी संगम तटावर उसळत आहे. अशा पार्श्वभूमीवर शंकराचार्य पदावरील वाद आणि प्रशासनाची नोटीस ही बाब मेळ्याच्या काळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
------------------------------------
