रीव्यातील निवृत्त संयुक्त कलेक्टर मोहनलाल द्विवेदी यांनी गेल्या ५० वर्षांपासून झोप न लागल्याचा दावा केला आहे. हा दावा वैद्यकीय विज्ञानाला हादरवणारा मानला जात आहे.
रीवा : झोप ही माणसाच्या आयुष्यासाठी ऑक्सिजनइतकीच आवश्यक मानली जाते. मात्र मध्य प्रदेशातील रीवा येथील एका निवृत्त अधिकाऱ्याने केलेल्या दाव्याने वैद्यकीय विज्ञानासह सर्वसामान्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. रीवा शहरातील चाणक्यपुरी कॉलोनीत राहणारे ७५ वर्षीय निवृत्त संयुक्त कलेक्टर मोहनलाल द्विवेदी यांनी गेल्या सुमारे ५० वर्षांपासून आपल्याला झोपच लागत नसल्याचा दावा केला आहे.
मोहनलाल द्विवेदी यांचे म्हणणे आहे की, १९७३ च्या सुमारास ही समस्या सुरू झाली आणि त्यानंतर आजपर्यंत त्यांना झोप आलेली नाही. विशेष म्हणजे झोप न लागूनही ते पूर्णपणे सक्रिय, तंदुरुस्त आणि सामान्य जीवन जगत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ आणि संशोधन अहवालांनुसार दररोज ६ ते ८ तासांची झोप न मिळाल्यास शरीरावर गंभीर परिणाम होतात, असे सांगितले जाते. मात्र या सर्व दाव्यांना छेद देत मोहनलाल कोणतीही मोठी शारीरिक किंवा मानसिक अडचण नसल्याचे सांगतात.
ते म्हणतात की, त्यांना झोप येत नसली तरी थकवा, डोळ्यांची जळजळ किंवा काम करण्याच्या क्षमतेत घट जाणवत नाही. इतकेच नव्हे तर दुखापत झाल्यासही सामान्य माणसांप्रमाणे वेदना होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९७३ मध्ये व्याख्याता म्हणून केली होती. १९७४ मध्ये मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते डेप्युटी तहसीलदार झाले आणि २००१ मध्ये संयुक्त कलेक्टर पदावरून निवृत्त झाले.
निवृत्तीनंतरही मोहनलाल द्विवेदी यांची दिनचर्या नियमित असल्याचे सांगितले जाते. ते बराच वेळ पुस्तके वाचनात घालवतात आणि अनेकदा रात्री छतावर फिरताना दिसतात. विशेष बाब म्हणजे त्यांच्या पत्नी केवळ ३ ते ४ तासांची झोप घेतात, अशी माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञ मात्र या दाव्याबाबत साशंक आहेत. त्यांच्या मते, वैद्यकीय विज्ञानानुसार कोणताही मनुष्य सलग ५० वर्षे अजिबात न झोपता जिवंत आणि निरोगी राहू शकतो, असे मान्य करता येत नाही. झोपेअभावी काहीच दिवसांत मेंदूवर गंभीर परिणाम होतात. स्मरणशक्ती, विचारक्षमता, हार्मोन्स, हृदयाचे कार्य आणि रोगप्रतिकारशक्तीवर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय अभ्यासानुसार दीर्घकाळ झोप न घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता घटते, तणाव, नैराश्य आणि चिडचिडेपणाचा धोका वाढतो. तसेच उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोकचा धोका वाढतो आणि शरीराची रोगांशी लढण्याची ताकद कमी होते. हार्मोनल असंतुलनामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांचाही धोका संभवतो.
अशा परिस्थितीत मोहनलाल द्विवेदी यांचा ५० वर्षे झोप न लागण्याचा दावा हा वैद्यकीय तपासणी आणि संशोधनाचा विषय ठरत आहे. हा दावा कितपत सत्य आहे, याबाबत तज्ज्ञांकडून अधिक सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
-------------–--------
