राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष हिंदू संमेलनात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जातिवादावर टीका करत राष्ट्रवादाची गरज अधोरेखित करणारे विधान केले.
बांदा : उत्तर प्रदेशातील बांदा येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष हिंदू संमेलनात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जातिवादावर तीव्र शब्दांत प्रहार करत देशात राष्ट्रवाद सर्वात महत्त्वाचा असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
संमेलनात भाषण करताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अत्यंत ठळक शब्दांत इशारा देताना सांगितले, “ज्या दिवशी तिरंग्यात चंद्र आला, त्या दिवशी न तो शर्मा बचेंगे, न वर्मा बचेंगे, न क्षत्रिय बचेंगे, न रविदासवाले बचेंगे, न तुलसीदासवाले बचेंगे, म्हणजे एकही हिंदू शिल्लक राहणार नाही.” त्यांच्या या विधानातून जातीय भेद विसरून एकत्र न राहिल्यास संपूर्ण समाजाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना त्यांनी शेजारील बांगलादेशचे उदाहरण दिले आणि तिथे अल्पसंख्याकांवर झालेल्या अत्याचारांचा उल्लेख केला. समाज जातिवादात अडकून राहिला, तर अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की देशाला आज जातिवादाची नव्हे, तर राष्ट्रवादाची गरज आहे. हिंदू समाज जर जाती-जातींमध्ये विभागलेला राहिला, तर त्याचा फटका संपूर्ण समाजाला बसणार असून राष्ट्र आणि धर्माची एकता धोक्यात येईल, असे मत त्यांनी मांडले. जातिभेदाच्या भिंती पाडून एकसंध विचारधारा निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
हा कार्यक्रम RSSच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या हिंदू संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे विचार ऐकण्यासाठी कार्यक्रमस्थळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान, सध्या बांदा येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची हनुमंत कथा सुरू असून त्यानिमित्ताने ते शहरात उपस्थित आहेत. हनुमंत कथेच्या कार्यक्रमालाही मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित राहत असून संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे येत्या काळात सामाजिक आणि राजकीय पातळीवर अधिक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
------------------------
