डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिकेकडून फायटर जेट्स आणि युद्धसज्ज हालचाली वाढल्या असून इराणवर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायमच त्यांच्या आक्रमक धोरणांमुळे चर्चेत असतात. टॅरिफ वॉरपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणात थेट हस्तक्षेपापर्यंत ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय जगाचं लक्ष वेधून घेत आहेत. भारतासह अनेक देशांवर लादलेले टॅरिफ, व्हिसा धोरणातील बदल आणि विविध देशांवर दबाव टाकण्याची भूमिका यामुळे अमेरिका सातत्याने जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
दरम्यान, ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या अमेरिकेच्या धोरणामुळे युरोपियन राष्ट्रांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. या धोरणाला विरोध करणाऱ्या आठ युरोपियन देशांवर अमेरिकेने दहा टक्के टॅरिफ लावल्याने अमेरिका आणि युरोपमधील तणाव अधिकच वाढला आहे. हा टॅरिफ आणखी वाढवण्याची धमकी देण्यात आल्याने व्यापारयुद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे पुन्हा एकदा युद्धाची चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेकडून मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनाती केली जात असून फायटर जेट्स, एअरक्राफ्ट कॅरिअर आणि क्षेपणास्त्र प्रणाली सज्ज करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने जॉर्डनमध्ये १२ एफ-१५ फायटर जेट्स आणि हवेत इंधन भरण्याची क्षमता असलेली चार केसी-१३५ विमाने तैनात केली आहेत. ही विमाने जॉर्डनच्या मुवाफ्फक सॉल्टी एअरबेसवर उतरल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांकडून ही तैनाती नियमित लष्करी प्रक्रिया असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी संरक्षण तज्ज्ञ मात्र वेगळाच अंदाज व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते ही केवळ सरावाची बाब नसून, इराणविरोधात संभाव्य कारवाईची तयारी असू शकते. यापूर्वीही इराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने जॉर्डनमधील एअरबेसचा वापर केला होता.
या सगळ्या घडामोडींमुळे जागतिक पातळीवर तणाव वाढला असून, अमेरिकेच्या पुढील हालचालींकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. आता खरोखरच युद्ध अटळ आहे का, की ही केवळ दबाव तंत्राची रणनीती आहे, याबाबत सध्या मोठी अनिश्चितता कायम आहे.
-------
