१ डिसेंबरपासून पेन्शन ते एलपीजी हे होणार महत्वाचे बदल !

 अंतिम मुदती संपताच नागरिकांवर थेट परिणाम होणार

मुंबई : नोव्हेंबर महिना आता संपत आला असून अनेक सरकारी आणि आर्थिक प्रक्रियांच्या अंतिम मुदती ३० नोव्हेंबरला पूर्ण होत आहेत. ही कामे वेळेत न केल्यास १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल लागू होणार असून त्याचा सरळ परिणाम पेन्शनधारक, करदाते, सरकारी कर्मचारी आणि घरगुती व व्यावसायिक एलपीजी वापरकर्त्यांवर होणार आहे. 

युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) निवडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंतची तारीख असली तरी नंतर ती वाढवण्यात आली; मात्र आता १ डिसेंबरपासून हा पर्याय संपणार आहे. 

पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख देखील ३० नोव्हेंबर आहे. वेळेत सादर न केल्यास पेन्शन थांबण्याची शक्यता असून डिजिटल जीवन प्रमाणपत्र घरबसल्या सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

करदात्यांसाठीसुद्धा ३० नोव्हेंबर महत्त्वाची तारीख आहे. ऑक्टोबर २०२५ महिन्यात टीडीएस वजा झालेल्या व्यवहारांबाबत कलम १९४-आयए, १९४-आयबी, १९४एम आणि १९४एस अंतर्गत विवरणपत्र सादर करणं अनिवार्य आहे. तसेच कलम ९२ई अंतर्गत अहवाल सादर करायचा असलेल्या करदात्यांनाही ३० नोव्हेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

घरगुती अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे बदलही १ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्या एलपीजीच्या किमतीत बदल करतात. १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक १९ किलो सिलिंडरच्या किमतीत ₹६.५०ची कपात करण्यात आली होती, परंतु १ डिसेंबरपासून किंमती वाढतील की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या दरांमध्येही महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारणा केली जाते, त्यामुळे विमानवाहतुकीच्या खर्चावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नियमांच्या बदलांपासून आर्थिक फटका बसू नये यासाठी नागरिकांनी कागदपत्रे, कर प्रक्रिया आणि पेन्शनशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे.


 -----------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने