इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; साधेपणाचा उपदेश देणाऱ्या महाराजांवर टीकेची झोड !

संगमनेर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि जनतेचे लाडके प्रवचनकार इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या कन्येचा, ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा नुकताच अहिल्यनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले असून, अनेक ठिकाणी या सोहळ्याची चर्चा रंगली आहे.

इंदुरीकर महाराज नेहमी आपल्या किर्तनांतून "लग्न साध्या पद्धतीने करा, अनावश्यक खर्च टाळा" असा उपदेश देत आले आहेत. मात्र त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याचा राजेशाही थाट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. व्हिडिओंमध्ये गाड्यांचा ताफा, वसंत लॉन्स येथे सजवलेले मंडप, नवरदेवाचा पारंपरिक पोशाख आणि मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसत आहे. काहींनी सोशल मीडियावर यावरून थेट टीका करत साधेपणाच्या उपदेशाशी या सोहळ्याचा विसंवाद असल्याचे म्हटले आहे.

या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या युवकासोबत झाला. साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, बांधकाम व्यवसायाशी संबंधित असल्याचे समजते. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. इंदुरीकर महाराज यांनी स्वतः उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी साधेपणा राखल्याचं सांगितलं. "सर्व लोक जमिनीवर बसून जेवले, खुर्च्यांचा वापर नव्हता, खर्च साधाच ठेवला," असा दावा त्यांनी केला.

मात्र सोशल मीडियावर काहींनी त्यांचे स्पष्टीकरण नाकारत मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. काहींनी लिहिले, "उपदेश एक आणि कृती दुसरी," तर काहींनी म्हटले, "महाराजांनी दिलेले संस्कार छान, पण अमलात आणणे आवश्यक आहे." दुसरीकडे, अनेक भक्तांनी महाराजांचा बचाव करत "मुलीचा साखरपुडा म्हणजे एकदाच होणारा प्रसंग, त्यात थोडा थाट असावा हे स्वाभाविक आहे" असे मत मांडले आहे.

संपूर्ण राज्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात इंदुरीकर महाराजांचे मोठा भक्तवर्ग आहे. त्यांच्या विनोदी आणि वास्तववादी कीर्तनांमुळे ते घराघरात परिचित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील हा साखरपुडा केवळ एक वैयक्तिक सोहळा न राहता तो लोकचर्चेचा विषय बनला आहे.

या साखरपुड्याच्या माध्यमातून पुन्हा समाजमाध्यमांवर साधेपणा, परंपरा आणि वास्तव यावर मोठा वाद रंगताना दिसत आहे. महाराजांवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पुढे ते काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


     

    ------------------------------------------------------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने