आठ देशांचे नामांकन पण ट्रम्पच्या हातून निसटले नोबेल
नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेल्या नोबेल शांतता पुरस्कार 2025 चा विजेता अखेर जाहीर झाला आहे आणि यावेळी हा मान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नव्हे, तर व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरिना माचाडो यांना मिळाला आहे.
नोबेल समितीने माचाडो यांना “तानाशाहीविरोधात लोकशाही आणि शांततेसाठी न थकता लढणाऱ्या धैर्यशाली नेत्या” म्हणून गौरवले आहे. माचाडो सध्या देशातील राजकीय तणावामुळे गुप्त ठिकाणी राहत आहेत. तरीसुद्धा त्यांनी देशात लोकशाहीचा दिवा विझू दिला नाही आणि हाच त्यांच्या सन्मानाचा पाया ठरला.
नोबेल समितीच्या अध्यक्षा म्हणाल्या, वाढत्या अंधारातही मारिया माचाडो यांनी लोकशाहीची ज्योत प्रज्वलित ठेवली. त्यांचा संघर्ष हा संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी आहे.”
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नावदेखील या वर्षी चर्चेत होते. तब्बल 8 देशांनी ट्रम्प यांचे नामांकन केले होते यात पाकिस्तान, इस्राएल, अमेरिका, आर्मेनिया, अझरबैजान, माल्टा, कंबोडिया आणि अर्जेंटिना यांचा समावेश होता. मात्र, नोबेल समितीने यावेळी “लोकशाहीच्या लढ्यातील खऱ्या योद्ध्या” माचाडो यांना प्राधान्य दिले.
मारिया कोरिना माचाडो या व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी नेत्या असून देशातील नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देतात. टाईम मॅगझीनने त्यांना “2025 मधील 100 प्रभावशाली व्यक्ती”ंमध्ये स्थान दिले आहे. त्यांच्या ठाम आणि स्पष्ट वक्तव्यामुळे त्या देशातील “आयर्न लेडी” म्हणून ओळखल्या जातात.
Maria Corina Machado wins 2025 Nobel Peace Prize
