पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी मौन सोडले
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आक्रमक आणि जहरी भाषेत टीका सुरू ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पडळकरांना समज दिली होती. मात्र, त्यानंतरही पडळकर यांनी टीकेचा सूर कमी केला नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आतापर्यंत मौन पाळले होते. परंतु नुकत्याच इस्लामपूर येथे आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी अखेर अप्रत्यक्षपणे पडळकरांना उत्तर दिले. जयंत पाटील म्हणाले, “वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचं उत्तर देऊ, तोपर्यंत वाट बघू. टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम तर होणारच. मी मागे एकदा म्हटलं होतं की, ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही.’” या वक्तव्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
जयंत पाटील पुढे म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली होती, असं मला समजतं. त्यातून त्यांनी काय बोध घेतला, हे माहित नाही. माझ्याविरोधात अनेकांनी मिळून अनेक गोष्टी केल्या, चौकशी करा, तपास करा असं म्हटलं. मला काहीही अडचण नाही, पण बोलू नका, थेट चौकशी करा.” असं म्हणत त्यांनी दंड थोपटले.
ते पुढे म्हणाले, “एका व्यक्तीने माझ्या आईवडिलांविषयी चुकीची भाषा वापरली आणि त्या व्यक्तीच्या समर्थनासाठी सगळ्यांनी मिळून सभा घेतली. भाजपमध्ये असा प्रकार मी कधीच पाहिला नव्हता. या सगळ्यामुळे आमच्या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकांची प्रतिक्रिया वेगळी आहे आणि हे सगळं जाणूनबुजून केलं जातंय, अशी लोकांची खात्री आहे. निवडणुकीत याची प्रचिती येईल. या सगळ्याला लोकांनी मतपेटीतूनच उत्तर दिलं पाहिजे.”
दरम्यान, जयंत पाटील यांना विचारण्यात आलं की, “प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर तुम्ही शांत का आहात?” यावर ते म्हणाले, “मी प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या मतदारसंघातील लोकांना भेटू शकत नव्हतो. माझा जनसंपर्क कमी झाला होता. पण आता जबाबदारी नसल्यामुळे मला लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटता येतंय.” असं सांगत जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Jayant Patil on Padalkar criticism
