उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांना थेट संदेश दिला. ठाकरे ब्रँडची अजून सुरुवातही झालेली नाही, सुरुवात झाल्यावर बघा काय होतं ते, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात या वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे.
या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्या, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि ठाकरे ब्रँडच्या भविष्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, लोकांनी कामांची मागणी केली आणि मी त्यांना सांगितले की, काम करण्याची निष्ठा आणि जिद्द सर्वात महत्त्वाची आहे. आलेल्या वादळाला तुम्ही उतर दिली आहे. बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याची मला चिंता नाही, पण बेस्टचं काय होईल याची काळजी आहे. गद्दारी झालेल्या लोकांची निष्ठा कोणाच्या पायाशी आहे हे सगळ्यांना ठाऊक झालं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, बेस्टचे निवृत्त कर्मचारी बाहेर पडत आहेत आणि त्यांच्या जागी कंत्राटी कामगार घेतले जात आहेत. सरकार कर्मचाऱ्यांना कायम चिंतेत ठेवत आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर लटकती तलवार ठेवली गेली आहे. पराभवाचं कारण काहीही असो, पण मी पराभवातून खचणारा नाही, विजयी होण्यासाठी पराभवाचा उपयोग करणारा आहे. मत चोरीच्या घटना घडत आहेत. विरोधकांना जर पराभव करायचाच असेल तर प्रामाणिकपणे करा, पण मत चोरी करून नाही. ही वृत्ती धोकादायक आहे.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या ओळखीबाबत आणि मराठी माणसाच्या हक्कांबाबतही ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, बेस्ट ही मुंबई शहराची रक्तवाहिनी आहे. मी स्वतः विद्यार्थी असताना बेस्टने प्रवास केला आहे. मी मुख्यमंत्री असताना अनेक डेपोंचं नूतनीकरण केलं. बेस्ट अडाणी किंवा इतर उद्योगपतींच्या हातात देऊ नका. सरकारकडे सत्तेची ताकद आहे पण लोकांना द्यायला पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राने मिळवली पण मराठी माणसाला स्थान नव्हतं, ते शिवसेनेने मिळवून दिलं. बेस्ट पॅनलमध्ये आम्हाला मत का मिळालं नाही हे आपणच एकमेकांना विचारावं. ठाकरे ब्रँडची अजून सुरुवात नाही झाली आहे, पण एकदा सुरुवात झाली की काय होतं ते सगळ्यांना दिसेल. आपल्या राज्यातील मराठी हिंदूंसाठी आम्ही आहोत, नाहीतर आम्हाला लढायची काही खाज नाही. बेस्टचं खाजगीकरण होऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे.
या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची विचारधारा आणि कामगार सेनेचा आधार घट्ट असल्याचा संदेश दिला आहे. ठाकरे ब्रँडच्या नावावरून सुरू झालेली ही सूचक राजकीय चाल आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय समीकरण तयार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
what happened when Thackeray brand launched
