यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरीसुध्दा अजूनही काही नागरिकांना आजाराचा गांभिर्य आलेले दिसत नाही. कोणतीही भीती मनात न बाळगता काही बेजबाबदार नागरिक बिनधास्तपणे विनामास्क वावरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
याबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला तशा सुचना दिल्या असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला याबाबत सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र याबाबत काही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहे. त्यामुळे आता सार्वजनिक स्थळी चेह-यावर मास्क न वापरणे या बाबीचे उल्लंघन करणा-या व्यक्तिवर प्रथम दंडात्मक व त्यानंतर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था (नगर पालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायत) आणि पोलिस प्रशासन करणार आहे.
सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरतांना प्रथम आढळल्यास ५०० रुपये दंड, दुसऱ्यांदा व तिसऱ्या वेळेस आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी निर्गमित केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यां व्यक्तिविरुध्द साथरोग प्रतिबंधित कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहितेचे कलम १८८ व इतर कायदे आणि नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमुद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response