Breaking

Post Top Ad

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

'चंदनाची शेती' करणाऱ्यांसाठी अडचणी ठरणाऱ्या कायद्यात बदल करू; वनमंत्री संजय राठोड

'चंदनाची शेती' करणाऱ्यांसाठी अडचणी ठरणाऱ्या कायद्यात बदल करू; वनमंत्री संजय राठोड
यवतमाळ : कोरीव काम, काष्ठ शिल्प, सुगंधीत तेल व विविध बाबींसाठी जागतिक बाजारपेठेत चंदनाला मोठी मागणी असून पुरवठा मात्र अतिशय अल्प प्रमाणात आहे. चंदनाची शेती ही शेतकऱ्यांना समृद्ध बनवून त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी महत्वाचे घटक होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणाऱ्या चंदनाच्या शेतीसाठी कायद्यात येणाऱ्या अडचणीत सुधारणा करण्यासाठी वनविभाग पुढाकार घेईल, असे मत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.

चंदन लागवडीस प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने चंदनाची वृक्ष लागवड, वृक्षतोड आणि वाहतुक विल्हेवाटबाबत आयोजित वेबिनार सत्राचे उद्धाटन वनमंत्री संजय राठोड यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतात चंदनाची निर्यात करण्यास बंदी आहे, असे सांगून वनमंत्री राठोड म्हणाले, केवळ ५० ग्रॅम वजनाच्या तुकड्याखेरीज आपण चंदन निर्यात करून शकत नाही. चंदनाची वृक्षतोड, वाहतुक याबाबत कायदा व नियमांमध्ये सुलभता आणल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात चंदन वृक्ष लागवड करण्यासाठी समोर येतील. पुरातन काळापासून भारतात चंदनाच्या अस्तित्वाबाबत उल्लेख आहे. आजही चंदनाला अनन्यसाधारण महत्व आहे. चंदन ही अत्यंत मौल्यवान प्रजाती असून भारत, श्रीलंका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, पूर्व व दक्षिण आशिया या भागात चंदन प्रजाती आढळतात. भारतात वनक्षेत्रातील चंदन दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्राच्या वनात सुमारे ६१४ हेक्टर क्षेत्रातच चंदन आढळते. मागील चार-पाच वर्षात महाराष्ट्रातील कमी पावसाचे जिल्हे विशेषत: जालना, लातूर, सोलापूर, पुणे, धुळे, जळगाव व विदर्भातही खाजगी क्षेत्रात जवळपास १००० हेक्टर जमिनीवर चंदन लागवड करण्यात आल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

वेळीअवेळी तसेच कमी जास्त पडणारा पाऊस, दुष्काळ या सर्व परिस्थितीत चंदनाची शेती ही शेतकऱ्यांना समृद्ध बनवून त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी महत्वाचे घटक होऊ शकते. महाराष्ट्र शासनाच्या ‘कन्या वन समृद्धी’ योजनेअंतर्गत मुलीच्या नावे चंदनाची दहा रोपे लागवड तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत शेताच्या बांधावर चंदन वृक्ष लागवड करता येते. आजच्या वेबीनार मध्ये शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती केंद्रभूत मानून चदंनवृक्ष लागवड, वृक्षतोड आणि वाहतुक  याबाबत अडचणी, मार्गदर्शन, सुचना व चर्चा करण्यात यावी, अशी अपेक्षा वनमंत्री राठोड यांनी व्यक्त केली.

वेबीनारमध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक(संरक्षण) एन. मोहन कर्नाट यांनी प्रास्ताविक केले.  तर एफ.डी.सी.एम.लि. नागपूर चे मुख्य महाव्यवस्थापक एम. श्रीनिवास राव, आय.डब्ल्यु.एस.टी. बंगलोर चे विभाग प्रमुख डॉ. सुंदर राज, वन संरक्षक (वन विनियमन) एस.एस.दहीवले यांनी मार्गदर्शन केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव व डॉ. एन. रामबाबु यांनी समारोपीय अभिप्राय व्यक्त केले. वेबीनार मध्ये वनविभागाचे अधिकारी, शेतकरी व उद्योजक यांनी भाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad