काल सायंकाळी पासून दिग्रस तालुक्याच्या विविध भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील नाले व ओढे तुडुंब भरून वाहू लागले. अशातच तालुक्यातील आरंभी येथील माय- लेकीचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला.
कविता किशोर राठोड (वय-३५) व त्यांची मुलगी कु.निमा किशोर राठोड (वय-१५) रा.आरंभी असे पुरात वाहून गेलेल्या माय-लेकीचे नाव आहे. या दोघी शेतात निंदन करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान जोरदार पाऊस बरसल्याने त्या दोघी घरी परत निघाल्या. तोपर्यंत गावाजवळील नाल्याला पुराचे पाणी सुरू झाले होते.
पुराचे पाणी असताना या दोन्ही मायलेकी पुल पार करीत असताना दोघेही वाहून गेल्या नंतर गावकऱ्यांनी शोधाशोध केली परंतु त्या दोघींचा पत्ता लागला नाही. दि.१४ जुलै २०२० रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी या दोन्ही मायलेकींचा मृतदेह जवळपास अडीच किलोमीटर दूर आढळून आला. शासकीय यंत्रणा याबाबत तपास कार्य करीत आहे.