Breaking

Post Top Ad

बुधवार, १ जुलै, २०२०

राज्यात पुन्हा असा धाडसी मुख्यमंत्री होणे नाही!

राज्यात पुन्हा असा धाडसी मुख्यमंत्री होणे नाही!
'महानायक'चा महाराष्ट्रनामा
महाराष्ट्राच्या राज्य निर्मितीनंतर राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या पहिल्या-दुसऱ्या फळीतील १९६३ ते २०२० या ५७ वर्षाच्या कारकर्दीतील लोकप्रिय राजकीय नेत्यांची मांदियाळी समोर येताच प्रमुख्याने यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची नावे समोर येतात. पण जे महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले गेले, ते राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना मात्र सर्वांनीच विस्मृतीच्या पडद्यामागे ढकलून दिले. सलग १२ वर्षे, १९६३ ते १९७५ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सांभाळत राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांत धाडसी निर्णय घेऊन राज्याला अग्रेसर बनवून देशात महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करणाऱ्या वसंतराव नाईकांची त्यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने उपेक्षाच केली. 
कै.वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकराव नाईक आणि माजी मंत्री मनोहराव नाईक
राज्यातील काँग्रेसने वसंतरावांच्या कार्याची योग्यरीत्या नोंद ठेवली नाही. त्यामुळे आजच्या पिढीला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्य माहितीची तोंडओळखही झाली नाही. झोपेचे सोंग घेणार्या्ने अचानक उठल्याचे नाटक करून प्रसंग निभावून न्यावा तसेच काहीसे आघाडी सरकारने वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुंबईत मोठा कार्यक्रम घेऊन आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान करून घेतले. वसंतराव नाईक यांचा १ जुलै ला जयंतीच्या या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या कार्यक्रमात तात्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'वसंतराव नाईक यांनी राज्याला स्थैर्य देऊन प्रगतीच्या वाटेवर नेले,' असे गौरवोद्गार काढले. तेव्हा व्यासपीठावर आघाडी सरकारमधील अनेक नेते मंडळी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी वसंतरावांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांची माहिती सांगितली ते योग्य झाले; पण त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राज्यातील नेत्यांनी वसंतरावांच्या कोणत्या व किती स्मृती  जपल्या हे सांगणे कठीणच असल्याचे त्यावेळी दिसून आले. 
यवतमाळ मध्ये १९७३ साली मराठी साहित्य संमेलन दरम्यान
राज्यातील काँग्रेस पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी वसंतरावांच्या निधनानंतर (१९७९) त्यांनी केलेल्या राजकीय योगदानाबद्दल च्या कार्याचा गौरव करण्याचे मोठेपण कधीच दाखवले नाही. या कारणानेच अवघ्या ५७ वर्षात महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ ठरलेल्या मुख्यमंत्र्याला विस्मृतीच्या पडद्याआड जावे लागले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ या काळात सलग बारा वर्षे वसंतराव नाईक विराजमान होते. सर्वाधिक दीर्घ मुदतीची कारकीर्द लाभलेले नाईक हे एकमेव मुख्यमंत्री होते. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली गावी बंजारा या मागासवर्गीय; पण सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ साली वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. १९१३ ते १९७९ या त्यांच्या ६६ वर्षाच्या जीवन पटाकडे एक दृष्टीक्षेप टाकल्यास टप्प्याटप्प्याने त्यांचा राजकीय पदांचा चढता आलेख व मुख्यमंत्रिपदाच्या सर्वोच्च कारकिर्दीवर असताना द्यावा लागलेला राजीनामा आणि त्यानंतर त्याची झालेली उपेक्षा मनाला चटका लावून जाते.
पाया पासुन सुरुवात करत शिखरापर्यंत पोहोचावे तेथे एक-एक प्रदीर्घ कारकीर्द करत असताना अचानक कुणीतरी शिखरावरून कडेलोट करून पायथ्याशी आणून सोडावे. तसेच दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी वसंतराव नाईक त्यांच्या सोबत अखेरच्या काळात केले. ९ ऑगस्ट १९४२ ला मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात ते सामील झाले. तेव्हापासून त्यांचे राजकीय जीवन सुरू झाले. १९४३ ला पुसद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाल्यावर पुढे त्यांची पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदी निवड झाली. १९५० च्या काळात त्यांची जवळकी यशवंतराव चव्हाणांसोबत झाली आणि त्यांचा संवाद वाढला.१९५२ ला ते आमदार म्हणून (मध्य प्रांत) निवडून आले. येथे त्यांना महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नेमले गेले.
१९५६ ला महाराष्ट्राची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी विदर्भाला द्वभांषिक मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले. त्यातही वसंतरावांना सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आली. १९५७ ला द्विभाषिक मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण यांची निवड झाल्याने त्यांनी वसंतराव नाईक यांना कृषिमंत्री पद दिले. १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर मुख्यमंत्री यशवंतरावांनी वसंतरावांना महत्त्वाचे महसूल मंत्री पद दिले. १९६२ च्या राज्यातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुसद मतदारसंघातून वसंतराव नाईक तिसऱ्यांदा निवडून आले आणि मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा महसूल मंत्रिपद देण्यात आले १९६२ ला चीनच्या आक्रमणानंतर तात्कालीन पंतप्रधान नेहरूंनी यशवंतरावांना दिल्ली ला बोलावून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या कन्नमवार यांची कारकीर्द अल्पकाळात संपुष्टात आली. ५ डिसेंबर १९६३ ला यशवंतराव चव्हाण यांनी आपले राजकीय वजन वापरून वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविले. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच वसंतरावांनी धडाडीने धाडसी निर्णय घेण्याचा धडाकाच सुरू केला.
बोरगांव-आर्णी,यवतमाळ येथे १९७५ मध्ये सामुहिक विवाह मेळावा
यशवंतरावांनी घालून दिलेल्या पायावर शिखर चढताना वसंतरावांनी चौफेर काम केले. १४ फेब्रुवारी १९६४ ला मराठी ही राज्याची राज्यभाषा राहील, असा निर्णय वसंतराव नाईक यांनी घेतला. मटका-जुगार प्रकारांना आळा बसावा यासाठी त्यांनी राज्य शासनाची लॉटरी सुरू केली. दारू बंदीविषयक धोरणाचा व्यवहार्य विचार करून दारूविक्री खुली केली. सहकार चळवळीला बळ दिले. मुंबईला पर्याय म्हणून नवीन मुंबई उभारण्याची कल्पना वास्तवात नाईक यांनी उतरवली. असे असे निर्णय घेताना कोयनाचा भूकंप आणि १९७२ चा राज्यातला भीषण दुष्काळ या आपत्तीवर मात करताना ते धाडसी वृत्तीने प्रसंगाला समोर गेले. 
अन्नधान्यासाठी दुसऱ्या राज्याकडे हात पसरावा लागतो, यावर मात करण्यासाठी शनिवार वाड्यासमोर 'येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी जाहीरपणे फासावर जाईन' अशी धाडसी प्रतिज्ञा केली व पुढच्या काळात ते कृतीत करून दाखविले. शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी संकरित वाण त्यांनी राज्यात आणले. बहुतांश शेती सिंचनाखाली यावी म्हणून छोटे बंधारे व विहिरी खोदण्याचा धडक कार्यक्रम राबविला.
ज्वारी या पिकाची पाहणी करताना वसंतराव नाईक
रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार खरेदी, कृषी विद्यापीठांची निर्मिती, विरोधी पक्षनेत्याला 'कॅबिनेट मंत्री' पदाचा दर्जा असे अनेक क्रांतिकारक धाडसी निर्णय घेत १९६४ ते १९७५ या १२ वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत वसंतरावांनी महाराष्ट्राला स्थिरता देत अग्रेसर स्थानावर आणून ठेवले. स्वबळावर धडाडीने निर्णय घेणारे मुख्यमंत्री काँग्रेसला रुचत नसतात. त्यातच यशवंतराव इंदिरा गांधींच्या राजकीय संघर्षात वसंतरावांचा कल यशवंतरावांकडे झुकला  असल्याने योग्य वेळ येताच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेऊन वसंतरावांना अपमानास्पद वागणूक दिली. 
वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरे
राज्यातील नेत्यांनी दिल्लीचीच 'री' ओढत या धाडसी मुख्यमंत्र्यांच्या कार्याला अनुल्लेखाने मारून भावी पिढीला त्याची ओळख दूर होत जाईल याची पूर्ण काळजी घेतली. त्यामुळे सलग बारा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळत राजकीय, सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात धाडसी निर्णय घेऊन राज्याला अग्रेसर बनवून देशात महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करणाऱ्या वसंतराव नाईकांची त्यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने उपेक्षाच केली. राज्यातील काँग्रेसने वसंतरावांच्या कार्याची योग्यरीत्या नोंद ठेवली नाही. त्यामुळे आजच्या पिढीला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्य माहितीची तोंडओळखही  झाली नाही.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास नक्की शेअर करा आणि महाराष्ट्र24 पेज लाईक करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला तुमची माहिती या themaharashtra24@gmail.com ईमेल आयडीवर पाठवू शकता.
अथवा व्हाॅट्सअप क्रमांक  9764273121 यावर सुध्दा पाठवू शकता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad