जयकुमार गोरे, रुपाली चाकणकर यांच्यासह SP

तुषार दोशींवर सुषमा अंधारेंचा स्फोटक हल्लाबोल!,

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधारे थेट रणांगणात; पोलिस तपास, राजकारणी आणि प्रशासनावर थेट बोट ठेवत अंधारेंचा संताप म्हणाल्या 

“न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही!”

फलटण : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. राज्याचे  राजकारण तापवणारा मुद्दा ठरत आहे. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे रणांगणात उतरल्या आहेत. त्या पोलिस यंत्रणा, सत्ताधारी मंत्री आणि राष्ट्रवादी नेत्यांवर संताप व्यक्त करत म्हणाल्या “जयकुमार गोरे कोण तीस मार खान? आधी स्वतःचं चारित्र्य बघावं! रुपाली चाकणकर बाई चारित्र्य ठरवणार का?”

अंधारेंनी या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, त्यांनी फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत SP तुषार दोशींवर थेट हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “मृत डॉक्टरला न्याय मिळवून देण्याऐवजी पोलीस आणि राजकारणी तिचं चारित्र्यहनन करत आहेत. तुषार दोशी आणि रुपाली चाकणकर यांनी जाणूनबुजून समाजात चुकीचं चित्र निर्माण केलं.”

त्या पुढे म्हणाल्या, “जर तपासातील माहिती उघड करता येत नाही, तर मग रुपाली चाकणकरांनी त्या डॉक्टरचे चॅट कसे काय जाहीर केले? आणि SP तुषार दोशींनी त्यांना थांबवलं नाही म्हणजे तेही या कारस्थानात सहभागी आहेत का?”

अंधारेंनी आरोप केला की, “फलटण पोलीस ठाणं म्हणजे आता छळछावणी झालं आहे. माझा आक्षेप थेट SP तुषार दोशींवर आहे. अश्विनी बिद्रे आणि अंतरवाली सराटी प्रकरणात त्यांनी जे केलं, तेच इथे पुन्हा करत आहेत. आम्हाला त्यांच्या तपासावर विश्वास नाही!”

अंधारेंनी या प्रकरणातील सहा संशयितांची नावे घेत मागणी केली “डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे पीए शिंदे व नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ — यांच्यावर आरोप आहेत. पण आरोपपत्रात त्यांची नावेच नाहीत! मग कोणाला वाचवलं जातंय?” त्या म्हणाल्या, “मुलीच्या कुटुंबाचा जबाब आहे, पण पोलिसांच्या कागदावर त्याचा काहीच अर्थ नाही. हीच न्यायव्यवस्था आहे का?”

सरकारने IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी असल्याचं सांगितलं. मात्र, अंधारेंनी स्पष्ट केलं  “ही खरी एसआयटी नाही! फक्त तपासावर देखरेख ठेवण्यासाठी नाव वापरलं जातंय. आम्ही मागणी करतो या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी.”

सुषमा अंधारे म्हणाल्या  “हा पक्षीय लढा नाही. ही एका निष्पाप मुलीच्या सन्मानाची लढाई आहे. आम्ही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही!” या वक्तव्यांनंतर राज्यात पुन्हा  राजकीय वातावरण तापले आहे. फलटण प्रकरण आता न्याय, सत्तेचा गैरवापर आणि पोलिसांच्या पारदर्शकतेचा कस लावणारं प्रकरण बनलं आहे.

   

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने