पुणे : पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) रंगेहात पकडले आहे. प्रमोद चिंतामणी असे या अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याने जामीन प्रक्रियेत मदत करण्याच्या मोबदल्यात तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. न्यायालयाने त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला PSI प्रमोद चिंतामणी तक्रारदाराकडून 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACBच्या पथकाच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि खेळण्यातल्या खोट्या नोटांसह एकूण 46.53 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तक्रारदार व्यवसायाने वकील असून, त्यांच्या आशिलाविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात आशिलाच्या वडिलांनाही अटक झाली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या प्रकरणातील जामीन प्रक्रियेत मदत करण्यासाठी PSI चिंतामणीने दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार तक्रारदाराने ACBकडे दाखल केली.
एसीबीने प्राथमिक पडताळणी केल्यानंतर असे उघड झाले की, आरोपी उपनिरीक्षकाने दोन कोटींपैकी एक कोटी रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित एक कोटी वरिष्ठांसाठी मागितले होते. या मागणीची खातरजमा करण्यासाठी तक्रारदाराने एसीबीच्या सापळ्याच्या माध्यमातून 50 लाख रुपयांच्या पहिल्या हप्त्याची व्यवस्था केली.
यानंतर ACBने तक्रारदाराला खेळण्यातल्या नोटा देऊन सापळा रचला. आरोपीने 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताच तो रंगेहात पकडला गेला. पकडलेल्या रकमेपैकी 1.5 लाख रुपये खरे असून उर्वरित 45 लाख खेळण्यातल्या नोटा असल्याचे उघड झाले.
सध्या तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने लाच स्वतःसाठी मागितली की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, हे स्पष्ट करण्यावर केंद्रित आहे. या संदर्भात न्यायालयाने आरोपीला 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून ACBकडून पुढील तपास सुरू आहे.
