नवी मुंबई: भारतीय सलामीवीर शफाली वर्माने ICC महिला वनडे विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात इतिहास रचला आहे. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार 87 धावांची खेळी करत भारताला मजबूत सुरुवात करून दिलीच, पण त्याचसोबत ती विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारी जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे.
भारताच्या विश्वचषक संघातील नियमित सलामीवीर प्रतिका रावल दुखापतीमुळे बाहेर पडल्याने शफालीला अंतिम सामन्यात संधी मिळाली. आणि तिने या संधीचं सोनं केलं. वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करत, शफालीने आक्रमक फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.
उपांत्य फेरीत अपयश आल्यानंतरही शफालीने फायनलमध्ये आत्मविश्वासाने खेळ केला. तिने फक्त 49 चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि एकूण 78 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 87 धावा केल्या.
शफाली वर्मा 21 वर्षे आणि 278 दिवस वय असताना ही कामगिरी करत विश्वचषकाच्या इतिहासात (पुरुष आणि महिला मिळून) अर्धशतक झळकावणारी सर्वात तरुण फलंदाज ठरली आहे. तिच्या या विक्रमाने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
तीसरी भारतीय सलामीवीर म्हणून इतिहासात स्थान
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारी शफाली ही तिसरी भारतीय सलामीवीर ठरली आहे. 2003 पुरुष विश्वचषक फायनलमध्ये वीरेंद्र सेहवागने अर्धशतक झळकावलं होतं, 2017 महिला विश्वचषकात पूनम राऊतने अर्धशतक केलं होतं, आणि आता 2025 मध्ये शफाली वर्माने आपलं नाव त्या ऐतिहासिक यादीत नोंदवलं आहे.
शफालीचं हे अर्धशतक खास होतं कारण तीन वर्षांनंतर तिने वनडे सामन्यात पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. तिचं अखेरचं अर्धशतक जुलै 2022 मध्ये आलेलं होतं. त्या नंतर तिच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, पण फायनलमध्ये तिने जबरदस्त पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर दिलं.
पावसामुळे दोन तास उशिरा सुरू झालेल्या सामन्यात फलंदाजी कठीण असणार असं भासत असतानाच शफालीने मैदानात आक्रमक सूर लावला. तिच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने 299 धावांचं आव्हान उभं केलं, ज्यामुळे अखेर संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावलं.
शफाली वर्माची ही खेळी केवळ आकडेवारीचा विक्रम नाही, तर भारतीय महिला क्रिकेटमधील नव्या युगाची सुरुवात आहे. तिच्या आक्रमक फलंदाजीने “चक दे इंडिया”चा नारा वास्तवात उतरवला आहे आणि ती आजच्या घडीला भारताच्या भावी क्रिकेट शक्तीचं प्रतीक ठरली आहे.
