मराठी कलाविश्वात घटस्फोटांची मालिका, योगिता पासून सुयश, अक्षयपर्यंत अनेक जोड्यां विस्कटल्या


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत घटस्फोटांची मालिका सुरू असल्याचे दिसत आहे. एकामागून एक सेलिब्रिटी जोड्या विभक्त होत आहेत, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. अलीकडेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले, तसेच अक्षया गुरव आणि भूषण वाणी, यांच्याबरोबरच अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे यांच्या नात्यांमध्ये फाटाफूट झाल्याची चर्चा रंगली आहे.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले ही जोडी विभक्त झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. दोघांनीही आपले लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत आणि एकमेकांना अनफॉलो केल्याचे चाहत्यांच्या लक्षात आले आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया गुरवच्या संसारातही काही बिनसल्याचे समजते. आठ वर्षांपूर्वी तिने भूषण वाणीशी लग्न केलं होतं. पण अलीकडेच या दोघांनी एकमेकांचे फोटो सोशल मीडियावरून हटवले असून, एकमेकांना अनफॉलोही केले आहे.

अभिनेता सुयश टिळक आणि गायिका आयुषी भावे यांच्यातील नातेसंबंधांबाबतही अशाच चर्चा सुरू आहेत. 2021 मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्यानेही सोशल मीडियावर एकमेकांपासून अंतर घेतल्याचं दिसत आहे. मात्र, घटस्फोटाबाबत दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

याशिवाय, सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनीही त्यांच्या पत्नी नेहा देशपांडे यांच्याशी १७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट घेतल्याची माहिती सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर केली. या दोघांना रेणुका नावाची मुलगी आहे.

‘संगीत देवबाभळी’ या लोकप्रिय नाट्यसंगीतातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिचाही घटस्फोट झाला आहे. संगीतकार आनंद ओक यांच्याशी तिचं लग्न झालं होतं. “काही वर्षांपूर्वीच आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला,” असं तिने सोशल मीडियावर स्पष्ट केलं.

अभिनय, कीर्ती आणि लोकप्रियतेच्या या चकचकीत दुनियेत नातेसंबंध जपणं तितकंच कठीण ठरत असल्याचं   दिसून आलं आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने